Security Breach in Lok Sabha : संसदेच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेची सुरक्षा भंग करण्याचा कट 6 जणांनी रचला होता. कट रचणाऱ्या सहा जणांपैकी पाच जणांना पोलिसांनी पकडले आहे.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरच्या अमोल शिंदेसह सहाही आरोपी चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेत घुसखोरी करण्याचा कट रचला होता. आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते आणि बुधवारी संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली होती.
लोकसभेत काय झाले?
बुधवारी (13 डिसेंबर) लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या होत्या. हे दोघेही लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने बाकांवरून धावत सुटले. त्यानंतर एका तरुणाने त्याच्या बुटातून पिवळा गॅस काढला आणि फवारला. यावेळी संसदेत गदारोळ झाला. खासदारांची धावपळ सुरू झाली. मात्र, काही खासदारांनी त्यांना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा >> अमोल शिंदेच्या मदतीला महाराष्ट्रातील ‘हा’ वकील धावला, कोर्टात लढवणार बाजू
लोकसभेच्या आत दोन तरुणांनी उडी मारली, तेव्हा संसदेबाहेर निदर्शने करणाऱ्या लातुरच्या अमोल शिंदे आणि नीलम सिंह या तरुणीला पोलिसांनी अटक केली. दोघेही रंगीत गॅस फवारत होते आणि घोषणा देत होते.
या 5 आरोपींना अटक
संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापन दिनी सुरक्षेत गंभीर चूक घडली. हे चौघेही एकमेकांना ओळखत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आले आणि कार्यक्रमाचे नियोजन केले. पोलिसांनी सागर, मनोरंजन, अमोल आणि नीलम यांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरा आरोपी विशाल याला गुरुग्राममधून अटक करण्यात आली आहे. संसदेत पोहोचण्यापूर्वी सर्व आरोपी विशालच्या घरी थांबले होते. दुसरा आरोपी ललित याचा शोध सुरू आहे.
चौकशीत आरोपीने काय सांगितले?
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान अमोलने सांगितले की, तो शेतकरी आंदोलन, मणिपूर हिंसाचार आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांमुळे त्रस्त होता आणि त्यामुळेच त्याने हे केले. प्रत्येकाची विचारधारा समान असून सरकारला संदेश देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने चौकशीत सांगितले. आरोपींना कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने असे करण्यास सांगितले होते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
हेही वाचा >> ‘…तर माझ्या मुलाला फाशी द्या’, मनोरंजनाच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
सागर, मनोरंजन, अमोल, नीलम आणि ललित मंगळवारी रात्री गुरुग्राममध्ये विशालच्या घरी थांबले. सकाळी ते संसदेकडे रवाना झाले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, विशाल शर्मा आधी एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता, पण अलीकडेच त्याने ऑटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली. शेजाऱ्यांनी दावा केला की विशाल हा व्यसनाच्या आहारी गेलेला असून, तो अनेकदा पत्नीशी भांडतो.
ललितने शूट केला संसदेबाहेरचा व्हिडिओ
पोलिसांनी विशालच्या पत्नीलाही ताब्यात घेतले असून या घटनेतील तिची संभाव्य भूमिका तपासण्यात येत आहे. सहाही आरोपींना संसदेत प्रवेश करायचा होता, पण फक्त दोघांनाच पास मिळाला. ललितनेच अमोल आणि नीलम संसदेबाहेर डब्यातून धूर सोडत असल्याचा व्हिडिओ बनवला होता.
सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट
ललितने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला आहे. ललितकडे नीलम, अमोल, सागर आणि मनोरंजनचे फोनही होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कोणताही फोन जप्त करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस त्याचा फोन शोधण्यात व्यस्त आहेत.
नीलम हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. नीलमने MA, B.Ed, M.Ed, CTET, M.Phi आणि NET इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
पोलीस कर्मचारी नीलमला ताब्यात घेत असताना ती म्हणाली, भारत सरकार आमच्यावर अत्याचार करत आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवतो तेव्हा आम्हाला मारहाण करून तुरुंगात टाकले जाते. आपल्यावर अवास्तव बळाचा वापर केला जातो. आम्ही कोणत्याही संघटनेशी संबंधित नाही. आम्ही विद्यार्थी आहोत आणि बेरोजगार आहोत. आमचे पालक मजूर म्हणून काम करतात. शेतकरी आहेत आणि काही छोटे दुकानदार आहेत. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. हुकूमशाही चालणार नाही.
ADVERTISEMENT
