Vishalgad : "...ही घटना टळली असती"; शाहू महाराज संतापले, सरकारला सुनावले

मुंबई तक

15 Jul 2024 (अपडेटेड: 15 Jul 2024, 04:14 PM)

Shahu Chhatrapati Vishalgad news : विशाळगडावरील अतिक्रमणावरून झालेल्या हिंसाचारावर शाहू महाराजांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेबद्दलही भाष्य केले आहे. 

विशाळगडावर झालेल्या दगडफेड आणि मारहाणीवरून शाहू महाराज छत्रपतींनी सरकारला सुनावले आहे.

विशाळगडावर झालेल्या हिंसाचारावरून शाहू छत्रपती संतापले.

follow google news

बातम्या हायलाइट

point

विशाळगड हिंसाचारावर शाहू छत्रपती संतापले

point

विशाळगड घटनेनंतर शाहू महाराजांनी सरकारला सुनावले

point

शाहू महाराज छत्रपती संभाजीराजे छत्रपतींबद्दल काय बोलले?

Shahu Chhatrapati on Vishalgad Violence : विशाळगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न रविवारी (१४ जुलै) चिघळला. जमावाने विशाळगडावरील स्थानिकांच्या घरांवर दगडफेक केली. वाहनांची तोडफोड केली, त्याचबरोबर महिला आणि नागरिकांना मारहाण केली. विशाळगडावर घडलेल्या हिंसेनंतर खासदार शाहू छत्रपतींनी संताप व्यक्त केला. 

हे वाचलं का?

शाहू महाराज विशाळगडावरील हिंसाचारावर काय बोलले?

"विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून, घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे", अशा भावना शाहू महाराजांनी व्यक्त केल्या आहेत. 

मी आधीच सूचना दिल्या होत्या... -शाहू छत्रपती

"यासंदर्भात प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या", असे शाहू छत्रपतींनी म्हटले आहे.

"राज्य शासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश आहे", अशी खंत शाहू महाराजांनी व्यक्त केली.

"...तर ही घटना टळली असती"

खासदार शाहू छत्रपतींनी पुढे म्हटले आहे की, "राज्य सरकारने रविवारी अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश यापूर्वी दिले असते, तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी", असेही शाहू महाराजांनी म्हटले आहे. 

"माजी खासदार संभाजीराजे यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो", असेही शाहू महाराज म्हणाले. 

"हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काही केले नाही, तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल. उद्या (१६ जुलै) आम्ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहोत. कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल, तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे", अशी भूमिका शाहू महाराजांनी मांडली आहे. 

खासदार शाहू छत्रपतींनी म्हटले आहे की, "विशाळगडावरील अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने कारवी. त्यासंदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये."

 

    follow whatsapp