Uddhav Thackeray News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पहिले राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटले. ‘प्रभू श्रीरामाने बालीचा वध का केला? असा प्रश्न उपस्थित करत आपल्यालाही बालीचा राजकीय वध करावा लागेल’, असे उद्धव ठाकरे शिंदे यांचे नाव न घेता म्हणाले. (Uddhav Thackeray Speech Today)
ADVERTISEMENT
मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज जे काही रामाचे मुखवटे घालून रावण फिरताहेत, त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. तुम्ही माझी तुलना श्रीरामांशी केली नाही, त्याबद्दल आभार मानतो.”
मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; ठाकरे म्हणाले…
गोविंद देव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदींची तुलना केली. त्यावर ठाकरे म्हणाले की, “कारण काल (२२ जानेवारी) सगळे अंधभक्त तिकडे जमले होते. त्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांची बुद्धी आहे त्याचा आदर करतो. पण, कुणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे ‘आजचे शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान.’ अजिबात नाही. त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तर राम मंदिर उभं राहू शकलं नसतं. आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात आहात, ते केवळ हे तेज (शिवाजी महाराज) महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून. नाहीतर हे येरागबाळ्याचं काम नव्हतं.”
हेही वाचा >> “सध्याचा रावणही अजिंक्य नाहीये”, संजय राऊतांचं नाशिकमध्ये घणाघाती भाषण
“प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. जर तुम्ही तसं करत असाल, तर आम्हालाही भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजपमुक्त जय श्रीराम. काय चाललंय? श्रेय घ्यायचं तर घ्या. पण, रामाचा एक गुण तुमच्यात आहे, हे तरी आम्हाला कळू द्या. रामचंद्र हे एकवचनी होते, मग ज्या शिवसेनेने तुम्हाला त्या गादीपर्यंत पोहोचवलं, त्या शिवसेनेचं वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होऊ शकता?”, असा सवाल ठाकरेंनी मोदींना केला.
एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक ठाकरे काय बोलले?
शिवसेनेच्या निकालाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रभू श्रीरामाने बालीचा वध का केला? आणि आपल्याला सुद्धा बालीचा वध का करावा लागेल, कारण त्याने आपली शिवसेना पळवली आहे. ज्याने भगव्याशी प्रतारणा केली आणि आपली हक्काची शिवसेना पळवणारे कुणीही असतील. त्यांचा कुणीही वाली असेल, तरीही आम्ही त्याचा राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही. हा खरा निर्धार करा. कारण आता सगळं राममय झालेलं आहे. पण, जनतेचे प्रश्न तसेच आहे. राम की बात हो गई अब काम की बात करो. तुम्ही दहा वर्षात काय केलं हे सांगा. दहा वर्ष काय अंडी उबवत होतात का?”, अशा शब्दात ठाकरेंनी मोदींवर शरसंधान केले.
हेही वाचा >> कपाळी टिळा, रत्नजडित दागिने… रामलल्लाच्या अलौकिक श्रृंगाराचे वैशिष्ट्य काय?
“फक्त राम राम करायचं का? पीक विमा मिळाला का? नुकसान भरपाई मिळाली का? नोकऱ्या मिळाल्या का? दोन कोटी नोकऱ्या कोण देणार? सगळ्यांना भारावून टाकलं जातंय. सगळी चॅनेल्सवर दबाव आहे, ते म्हणतील तेच दाखवावं लागतं. हे तुमचं रामराज्य. हिंमत असेल, तर मैदानात या. मला शिवसैनिक वारसा हक्काने मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाहीत”, असं प्रत्युत्तरही ठाकरेंनी शिंदेंना दिलं.
“मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही प्रचार केला. मी प्रचार केला. त्यावेळी आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो? वर्षानुवर्षे शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या. तुमच्या पुचाट भाजपावाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली नाही. माझ्या मर्द शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली आहे. आज ते सगळे शिवसैनिक आज गुन्हेगार? अनिल परब गुन्हेगार, रवींद्र वायकर गुन्हेगार, किशोरीताई गुन्हेगार, सगळे गुन्हेगार?”, असा सवाल करत ठाकरेंनी मोदींना केला.
ADVERTISEMENT