Uddhav Thackeray Press Conference : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला. या निकालाने राजकीय वाद जास्त वाढला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नार्वेकरांना लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही नार्वेकरांच्या निर्णयानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदेंनी कोर्टाचे दार ठोठावल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी शिंदेंसमोर राजकीय प्रस्ताव ठेवला आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापत्रकार परिषद मुंबईत घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेने नार्वेकरांनी दिलेल्या निकालातील काही मुद्द्यांवर बोट ठेवलं. याच कार्यक्रमात भूमिका मांडतांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवा प्रस्ताव ठेवला.
उद्धव ठाकरे शिंदेंना कशासाठी प्रस्ताव द्यायला तयार?
ठाकरे म्हणाले, “हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षांकडे दिला होता. त्यांना सांगितंल होतं की, तुम्ही पात्र-अपात्र ठरवा. आता मिंधे उच्च न्यायालयात गेले की, आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवले नाही. त्यांनी सुद्धा त्यांच्यावर (राहुल नार्वेकर) नाराजीच व्यक्त केली आहे. मी असं म्हणतो की, तुम्हालाही न्याय मिळालेला नाही. आम्हालाही नाही. तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे.”
हेही वाचा >> एकनाथ शिंदे स्टेजवरच पडलेले ठाकरेंच्या पाया, ‘तो’ Video दाखवला अन्…
उद्धव ठाकरेंनी अधिवेशन बोलण्याची मागणी केली. ते म्हणाले, “राज्यपालांना मी विनंती करतो की, जसं त्यावेळी अधिवेशन बोलवलं होतं, तसं पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो की, अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. आज जाहीर करतो पाठिंबा. हाकला याला”, असा प्रस्ताव ठाकरेंनी शिंदेंसमोर ठेवला.
हेही वाचा >> शाहांनी दिला स्पष्ट ‘मेसेज’! ४८ जागांसाठी १२ क्लस्टर, स्ट्रॅटजी काय?
कशाला चाळे करता, ठाकरे संतापले
शिंदेंच्या शिवसेनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली. या भूमिकेवरही ठाकरेंनी टीका केली. ते म्हणाले, “कशाला चाळे करता आहात. उच्च न्यायालयात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना. तुमचा व्हीप आम्हाला लागणार का? व्हीप नंतर बघू आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे. तो आमचाच अधिकार आहे. व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबूक. चाबूक हा लाचाराच्या हाती शोभत नाही. चाबूक हा शिवसेनाप्रमुखांच्या आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो”, असेही ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT