मुंबई: खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सोहळ्याला गालबोट तर लागलंच पण याच बरोबर महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांच्याबाबत देखील काही सवाल उपस्थित केले जाऊ लागले. आप्पासाहेब धर्माधिकारी चालवत असलेली श्री समर्थ बैठक म्हणजे काय?, तिथे काय शिकवण मिळते? यासारखे अनेक प्रश्न आतापर्यंत विचारले जात आहेत. पण असं असताना आता नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानबाबतही काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या प्रतिष्ठानमध्ये चारच ट्रस्टी का? ते देखील आप्पासाहेब यांच्यासह त्यांच्याच घरातील चारच जणं का? याच प्रश्नांच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न ‘मुंबई Tak’ने केला आहे. (why only 4 trustees in nanasaheb dharmadhikari foundation that too from appasahebs own famil)
ADVERTISEMENT
सगळ्यात आधी आपण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेमकं काय आणि त्यांची कार्यकक्षा कशा स्वरुपाची आहे हे आधी जाणून घेऊया.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेमकं काय?
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही साधारण 2010 साली सुरु झाली होती. मात्र, 2014 ला तिला अधिकृत मान्यता मिळाली. धर्माधिकारी कुटुंब हे मागील अनेक वर्षांपासून श्री समर्थ बैठक चालवत आहेत. यासोबतच वेगवेगळ्या सामाजिक कार्यातही ते आणि श्री सदस्य हे सहभागी होत असत. मात्र, याला कोणत्याही प्रकारची योग्य अशी रचना किंवा मांडणी नव्हती. म्हणूनच सामाजिक कामांसाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. श्री सदस्यांची समाजाभिमुख कामांसाठी उपयोग व्हावा हा या प्रतिष्ठानचा मूळ उद्देश आहे. याच जाणीवेतून त्या प्रकारची कामं ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जातात.
हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेमकी काय-काय कामं होतात?
सामाजिक कामांसाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे तशाच स्वरुपांची कामं ही केली जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण, जलसंधारण, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि उद्योग यांच्याशी संबंधित अशी कामे केली जातात.
हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
आतापर्यंत श्री सदस्यांच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरात लाखो झाडे लावण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर जोपर्यंत झाडं मूळ धरत नाहीत तोवर श्री सदस्यांकडून त्याची निगा देखील राखली जाते. तसेच जलसंधारणाची अनेक कामं ही श्री सदस्य करतात. तर आरोग्याशी संबंधित सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान शिबिरं ही प्रतिष्ठानच्या वतीने नेहमी आयोजित केली जातात. अशी अनेक सामाजिक कामं ही केली जातात.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये फक्त चार ट्रस्टी?
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये फक्त चारच ट्रस्टी आहेत का? असा सवाल अनेक जण विचारत आहेत. तर याचं उत्तर हो असं आहे. याबाबत एक अधिकृत पत्रक मुंबई Tak च्या हाती लागलं आहे. ज्यामध्ये या प्रतिष्ठानमध्ये चारच सदस्य असल्याचं समोर आलं आहे. मात्र, हे पत्रक 2014 मधील आहे. त्यामुळे मधल्या काळात प्रतिष्ठानमध्ये इतर कोणत्या सदस्यांची नेमणूक झाली आहे की नाही. हे अद्याप तरी समजू शकलेलं नाही. तसंच याबाबत प्रतिष्ठानकडून तरी कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये आप्पासाहेबांसह घरातीलच चार जणं ट्रस्टी?
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये चारच ट्रस्टी असल्याचं आता समोर आलं आहे. पण हे चारही ट्रस्टी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील असल्याचंही पत्रकातून समोर आलं आहे.
हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या श्री समर्थ बैठकीतील अधिष्ठान म्हणजे काय.. श्री सदस्यांना कसं मिळतं?
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हे स्वत: आप्पासाहेब धर्माधिकारी हेच आहेत. पण याशिवाय या प्रतिष्ठानाचे ट्रस्टी म्हणून आप्पासाहेबांच्याच तीनही मुलांची नेमणूक करण्यात आली आहे. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आणि राहुल धर्माधिकारी असे तिघेही जण हे या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत. यांच्याशिवाय प्रतिष्ठानमध्ये इतर कोणी सदस्य असल्याचं त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर देखील नमूद करण्यात आलेलं नाही.
धर्माधिकारी कुटुंबीयांवर का केली जातेय टीका?
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा कारभार हा फार मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाही केवळ चार जण हे प्रतिष्ठानचे ट्रस्टी का? ते देखील एकाच कुटुंबातील सदस्यांची ट्रस्टी पदावर नेमणूक का? असा सवाल अनेक जण विचारत आहेत.
सध्या तरी या कोणत्याही प्रश्नाबाबत धर्माधिकारी कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. किंवा माध्यमांना माहिती देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT