Maharashtra Weather Update : राज्यात आज हवामानात बदल दिसून येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा प्रभाव राहील. विशेषतः सोमवारी, म्हणजेच उद्या, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही हलक्या पावसासह गडगडाट अपेक्षित आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोलीसह काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होऊन गारपीट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Beed : मशिदीत जिलेटीनचा स्फोट, मध्यरात्री बीड जिल्हा हादरला, दोघे ताब्यात, घटना नेमकी काय?
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि तीव्र हवामानामुळे होणाऱ्या बदलांमुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी बाळगावी, असं आवाहनही करण्यात आले आहे. पुढील 24 तासांत हवामानात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि ठाणे या महानगरांमध्ये रविवार रात्रीपासूनच ढगाळ वातावरण राहील आणि सोमवारी सकाळी किंवा दुपारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, परंतु वाहतुकीवर आणि रस्त्यांवर पाणी साचण्याचा परिणाम होऊ शकतो. विदर्भात मात्र परिस्थिती अधिक गंभीर असेल. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तापमानात अचानक घट होऊन गारपिटीचा धोका वाढला आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांसाठी खबरदारीचं आवाहन
हे ही वाचा >> पंतप्रधान मोदी 2014 नंतर पहिल्यांदा RSS मुख्यालयात, 'या' प्रकल्पांचं करणार उद्घाटन, वाचा यादी...
हवामानातील या बदलांमुळे शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विदर्भात गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांनी शक्यतो पिके झाकण्याचा प्रयत्न करावा आणि कापणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असे कृषी विभागाने सुचवले आहे.
ADVERTISEMENT
