'संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेचा खून?', संपूर्ण प्रकरण जसंच्या तसं

संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची हत्या करण्यात आली का? असा गंभीर सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

अंजली दमानिया यांनी केले गंभीर आरोप

अंजली दमानिया यांनी केले गंभीर आरोप

मुंबई तक

31 Mar 2025 (अपडेटेड: 31 Mar 2025, 10:41 PM)

follow google news

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी संबंधित एका महिलेचा खून झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी ट्वीट देखील केलं आहे. या ट्वीटमुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाला नवं वळण मिळालं असून, या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. दमानिया यांच्या दाव्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे.

हे वाचलं का?

अंजली दमानियांचं ट्वीट काय आहे?

अंजली दमानिया यांनी एक सविस्तर ट्वीट करत या प्रकरणातील नव्या घडामोडींचा खुलासा केला. त्यांनी लिहिलं, “गुंड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या? संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळंब शहरातील द्वारका नगरमध्ये राहणारी ही महिला होती. तिची 7 ते 8 दिवसांपूर्वी हत्या झाल्याचं कळतंय. दरवाजा तोडून बीड पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेह सडलेला असल्याने जागेवरच पोस्टमॉर्टेम करून अंत्यविधी उरकण्यात आले.”

दमानिया यांनी हा दावा करताना असा संशय व्यक्त केला की, ही हत्या संतोष देशमुख प्रकरणातील काही धागेदोरे लपवण्यासाठी किंवा तिच्या स्वतःच्या अनैतिक संबंधांमुळे झाली असावी. त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

हे ही वाचा>> संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!

“कुठल्या कारणाने हत्या झाली? बीड पोलिसांना ही बातमी कळली आणि ते घटनास्थळी पोहोचले, त्यानंतरच स्थानिक पोलिसांना आणि रहिवाशांना याची माहिती मिळाली.” असं म्हणत दमानिया यांनी पोलिसांच्या तपासावरही बोट ठेवत, याबाबत अधिकृत माहिती का समोर येत नाही, असा सवाल केला आहे.

महिलेच्या हत्येचा दावा: काय आहे प्रकरण?

दमानिया यांच्या ट्वीटनुसार, ही महिला संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक आरोप लावण्यासाठी तयार करण्यात आली होती. कळंब शहरातील द्वारका नगर परिसरात राहणारी ही महिला संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांच्या रडारवर होती. दमानिया यांचा दावा आहे की, तिची हत्या सुमारे 7 ते 8 दिवसांपूर्वी झाली आणि तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. बीड पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृतदेहाची अवस्था पाहता, जागेवरच पोस्टमॉर्टेम करून अंत्यसंस्कार करण्यात आले, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.

या महिलेची हत्या संतोष देशमुख प्रकरणाशी जोडली गेली आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दमानिया यांनी दोन शक्यता मांडल्या आहेत: एक म्हणजे, संतोष देशमुख प्रकरणातील काही महत्त्वाची माहिती दडवण्यासाठी तिची हत्या झाली असावी; आणि दुसरी म्हणजे, तिच्या स्वतःच्या अनैतिक संबंधांमुळे ही घटना घडली असावी. या दोन्ही शक्यतांमुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलं आहे.

हे ही वाचा>> वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरूंगात मारहाण करणारे 'ते' दोघं आहेत तरी कोण?

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी

संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच होते. 9 डिसेंबर 2024 रोजी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या झाली. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

आतापर्यंत या प्रकरणातील अनेक आरोपींना अटक झाली असली, तरी एक आरोपी अद्याप फरार आहे. या हत्येमागे वैयक्तिक वाद आणि राजकीय सूडबुद्धी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. अंजली दमानिया या प्रकरणात सुरुवातीपासून सक्रिय असून, त्यांनी वेळोवेळी पोलस तपास आणि राजकीय हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पोलिसांचं मौन, सोशल मीडियावर चर्चा

या प्रकरणात बीड पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दमानिया यांनी असा दावा केला आहे की, बीड पोलिसांना या हत्येची माहिती मिळाल्यानंतरच ते घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्यात आली. 

दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी दमानिया यांच्या दाव्याचं समर्थन केलं, तर काहींनी याला केवळ अफवा म्हटलंय. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोपही होऊ लागला आहे. बीडमधील स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण आधीच संवेदनशील आणि गुंतागुंतीचं होतं. आता अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या या नव्या दाव्याने ते आणखी गंभीर बनलं आहे. जर दमानिया यांचा संशय खरा ठरला, तर या प्रकरणातील काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या महिलेच्या हत्येची चौकशी सुरू केली आहे. 

या घटनेने बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंजली दमानिया यांच्या ट्वीटमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील रहस्य अजूनच गडद झालं असून, येत्या काळात याबाबत काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp