Lok Sabha Election 2024: ठाकरेंना कल्याणमध्ये 'ही' चूक महागात पडणार का?

रोहित गोळे

03 Apr 2024 (अपडेटेड: 03 Apr 2024, 04:31 PM)

Kalyan Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेंविरोधात एखादा तगडा उमेदवार देतील असा सर्वांचा कयास होता. मात्र, ठाकरेंनी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

2016 साली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच वैशाली दरेकरांनी शिवसेनेत प्रवेश केलेला (फाइल फोटो, सौजन्य: @Twitter)

2016 साली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच वैशाली दरेकरांनी शिवसेनेत प्रवेश केलेला (फाइल फोटो, सौजन्य: @Twitter)

follow google news

Vaishali Darekar vs Shrikan Shinde: कल्याण: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे सरकार गेल्यापासून उद्धव ठाकरे हे सातत्याने शिंदेंवर घणाघाती टीका करत होते. एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाला म्हणजेच श्रीकांत शिंदेंना तिकीट देऊन चूक केली.. असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, असं असताना आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी कल्याणच्या उमेदवाराबाबत जो निर्णय घेतलाय त्याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. (lok sabha election 2024 will this mistake cost uddhav thackeray dearly in kalyan loksabha vaishali darekar)

हे वाचलं का?

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिंदेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून सलग दोनदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळेच शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंनी देखील कल्याणसाठी रणनिती आखण्यासाठी सुरुवात केली होती. मात्र, उमेदवार देताना ठाकरेंची बरीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.

मुळात एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यावर त्यांचा दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेचं मोठं नेतृत्वच तयार झालं नाही. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी देखील ठाणे जिल्हा आणि विशेषत: कल्याण मतदारसंघाकडे फारसं लक्ष दिलं नाही. ज्याचा फटका त्यांना आता बसताना दिसतोय.

हे ही वाचा>> श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला! चार उमेदवारांची घोषणा

2009 साली शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या आनंद परांजपेंनी 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे 2014 साली तिथे नेमका उमेदवार कोण द्यायचा हा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर होता. त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी आपल्या मुलाला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केले आणि ते सफल झाले. त्यानंतर म्हणजे 2014 आणि 2019 अशा सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंनी घवघवीत यश मिळवलं. 

मात्र, या 10 वर्षाच्या काळात शिंदेंनी कल्याण मतदारसंघात त्यांना टक्कर देईल असं नेतृत्वच तयार होऊ दिलं नाही. ज्यामुळे आज (3 एप्रिल) उद्धव ठाकरेंना वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करावी लागली. 
 
कल्याणसाठी ठाकरेंकडून ज्या नावांची चाचपणी होत होती त्यामध्ये वैशाली दरेकर हे नाव आधी कुठेही चर्चेत नव्हतं. सुरुवातीला या जागेसाठी सुषमा अंधारे, केदार दिघे आणि वरूण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा होती. पण आज अचानक वैशाली दरकरे हे नाव जाहीर करण्यात आलं. खरं तर वरील तिघांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास असमर्थतता दर्शवली. त्यामुळे श्रीकांत शिंदेंसमोर उतरविण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे कोणताही तगडा उमेदवार नव्हता. अखेर वैशाली दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत ठाकरेंनी कल्याणच्या उमेदवाराचा प्रश्न निकालात काढला.

मात्र, असं असलं तरीही वैशाली दरकेर या श्रीकांत शिंदेंना निवडणुकीत टक्कर देऊ शकतात का? असा सवाल आता विचारला जात आहे. 

श्रीकांत शिंदेंच्या जमेच्या बाजू: 

अद्याप शिवसेनेने (शिंदे गट) श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, तेच या मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरेंकडून शिंदेविरोधात आव्हान उभं करण्याचा प्रयत्न झाला तरी श्रीकांत शिंदेंसाठी ही लढाई सोप्पी मानली जात आहे.

हे ही वाचा>> Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची रणरागिणी मैदानात

मुळात श्रीकांत शिंदे हे सलग दोन टर्म कल्याणचे खासदार आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात त्यांचा वावर आहे. याशिवाय आता त्यांच्यासोबत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची ताकदही आहे. तसंच श्रीकांत शिंदेंचे वडील स्वत: मुख्यमंत्री असल्याने निवडणूक प्रचारात त्याचा त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. कल्याण मतदारसंघातील शहरी भागात अनेक विकासकामं ही आता सुरू आहेत. त्याचा देखील या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंना फारसा फायदा होईल. 

वैशाली दरकरेंच्या जमेच्या बाजू:

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार हीच वैशाली दरकरे यांची जमेची बाजू आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला जी सहानुभूती मिळत आहे. त्याचाच फायदा हा वैशाली दरकरेंना होऊ शकतो. कारण दरकरेंचा वैयक्तिक असा करिष्मा नाही. 

2009 लोकसभा निवडणुकीनंतर वैशाली दरकरे या राज्यातील राजकारणार फारशा सक्रीय नव्हत्या. त्यावेळी त्यांनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 

मात्र, आता वैशाली दरकरे यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. एकीकडे दोन टर्म खासदार असलेला प्रचंड शक्तीशाली उमेदवार तर दुसरीकडे भल्या मोठ्या मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहचण्याची कसरत दरेकरांना करावी लागणार आहे. 

वैशाली दरेकर यांना उमेदवारी देणं हा उद्धव ठाकरेंना निर्णय कितपत योग्य आहे हे आपल्याला 4 जूनला समजेलच.. मात्र, मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीनंतर वेगळीच कुजबूज सुरू झाली आहे.

    follow whatsapp