Sangli lok Sabha election 2024 : (स्वाती चिखलीकर, सांगली) सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील वाद चिघळताना दिसत आहे. काँग्रेस सांगलीच्या जागेवरील दावा सोडायला तयार नसल्याने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी थेट इशारा दिला आहे. "आम्ही मैदानात उतरलो, तर मागे पुढे बघणार नाही. आलात तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय", असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ( Sanjay Raut Said if congress will not come with us Shiv Sena UBT will fight election alone)
ADVERTISEMENT
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक आहेत. तर ही जागा काँग्रेसकडे रहावी म्हणून विश्वजीत कदम यांनीही ताकद लावली आहे. विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या बैठकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते या जागेसाठी अडून बसले आहेत. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना ही जागा सोडायला तयारी नाही. त्यात राऊतांनी मोठं विधान केल्यानं महाविकास आघाडीच्या एकजुटीबद्दलच्या प्रश्नाने डोकं वर काढलं आहे.
कारण काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला नागपूरमध्ये बोलताना म्हणाले की, "सांगलीचा विषय आज सुटून जाईल. आघाडी असताना प्रत्येक पक्ष हा दावा करत असतो. आज किंवा उद्या सांगलीचा विषय सुटलेला असेल", रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं. पण, राऊतांच्या आर या पार च्या विधानाने मविआत सांगलीत बिघाडी होताना दिसत आहे.
सांगलीच्या जागेबद्दल संजय राऊत काय बोलले?
राऊत यांनी थेट काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत जाऊ काय चर्चा करणार असंही म्हटलं आहे.
सांगलीत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "सांगलीची जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही, काँग्रेससाठी. ही जागा आम्ही महाविकास आघाडीची मानतो. महाराष्ट्रातील 48 जागा एका पक्षाच्या नसून, महाविकास आघाडीच्या आहेत."
हेही वाचा >> "मातोश्रीवर अटॅक करायला फडणवीसांनी सांगितलं", सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट
"मविआ म्हणून आपण एकत्र लढलो, तर राज्यात उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रात काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल. सांगलीची लढाई सुद्धा केंद्रात काँग्रेसचा पंतप्रधान बसवा, यासाठी आहे. काँग्रेसला जर त्यांचा पंतप्रधान नको असेल, तर त्यांनी तसं सांगावं", असा सवाल राऊतांनी केलाय.
पुढे ते म्हणाले की, "एक-एक जागेची लढाई आहे. आम्ही सगळे उतरलेलो आहोत. आमचा पंतप्रधान बसवायचा नाही किंवा शरद पवारांना बसवायचं नाहीये. पंतप्रधान काँग्रेसचा होणार ना, त्यासाठी सांगलीचा महाविकास आघाडीचा खासदार निवडून येणं गरजेचं आहे."
हेही वाचा >> काँग्रेसच्या अजेंड्यावर आरक्षण, कर्जमाफी आणि 25 लाख...; 10 मोठ्या घोषणा
"हे असं ही जागा आमची, ती जागा तुमची, हे राष्ट्रीय पक्षाचे काम नाही. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे. हिंद केसरीने गल्लीतील कुस्ती खेळू नये. तू हिंद केसरी आहे... तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात. त्या उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे. सांगलीतलं बघू ना आम्ही. दिल्लीत दहा वेळा जाऊन काय तुम्ही निर्णय घेणार? निर्णय झालेला आहे; महाविकास आघाडीत शिवसेना ही जागा लढतेय."
इतकंच नाही, तर संजय राऊत म्हणाले, "आमची तयारी... महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची तयारी जोरात आहे. एकदा मैदानात आम्ही उतरलोय, तर मागे पुढे बघणार नाही. आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय... हे शिवसेनेचं गेल्या 55 वर्षांचं धोरण आहे."
"हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. कुणासाठी थांबत नाही. आम्ही निर्णय घेतलेला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि आम्ही पुढे जाऊ. ही जागा आम्ही जिंकणार, शंभर टक्के जिंकणार", असं राऊत म्हणाले.
विश्वजित कदमांबद्दल राऊतांचं मोठं विधान
सांगलीत पोहोचल्यानंतर राऊत म्हणाले की, "विश्वजीत कदम सुद्धा आमचे आहेत. विशाल पाटील सुद्धा आमचे आहेत. आघाडीमध्ये असं असतं की, प्रत्येक मतदारसंघात, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की, मतदारसंघ आपल्याकडे राहावा. पण, आघाडीमध्ये चर्चा, वाटाघाटीमध्ये कधीतरी मतदारसंघ मागे पुढे होत असतात."
"शिवसेना भाजप युती असताना सुद्धा असं झालेलं आहे. इकडे तर तीन-तीन पक्ष आहेत. कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं. पुढली दिशा पकडावी. विशाल पाटील हे संसदेत कसे जातील, यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल", असे विधान राऊतांनी केले.
ADVERTISEMENT