Sanjay Raut: 'ती नाची.. डान्सर, डोळा मारलं तरी जायचं नाही', नवनीत राणांवर बोलताना राऊतांची जीभ घसरली

मुंबई तक

18 Apr 2024 (अपडेटेड: 18 Apr 2024, 08:01 PM)

Sanjay Raut vs Navneet Rana: अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

नवनीत राणांवर बोलताना राऊतांची जीभ घसरली

नवनीत राणांवर बोलताना राऊतांची जीभ घसरली

follow google news

Lok Sabha Election 2024: अमरावती: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराला आता चांगलीच धार चढली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान हे उद्या (19 एप्रिल) पार पडणार आहे. त्यातच दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला आता वेग आला आहे. असं असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज (18 एप्रिल) अमरावतीत भाषण करताना भाजपच्या उमेदवार नवनीत राणांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. (sanjay raut controversial statement about navneet rana raut tongue slipped while campaigning in amravati lok sabha constituency)

हे वाचलं का?

'ही लढाई देशाची आहे.. ही लढाई बळवंत वानखेडे आणि ती नाची जी आहे तिच्याशी नाहीए. ही लढाई मोदीविरुद्ध महाराष्ट्र आहे.' असं वादग्रस्त विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

पाहा संजय राऊत नेमकं म्हणाले.

'ही लढाई देशाची आहे.. ही लढाई बळवंत वानखेडे आणि ती नाची जी आहे तिच्याशी नाहीए. डान्सरशी नाहीए.. बबलीशी नाहीए.. ही लढाई मोदीविरुद्ध महाराष्ट्र आहे... लक्षात आहे.. ही लढाई मोदीविरुद्ध उद्धव ठाकरे, ही लढाई मोदीविरुद्ध शरद पवार.. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे.' 

 

'तुम्हाला बाई खुणावेल.. ती पडद्यावरची नटी आहे.. तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमाने बोलावेल. पण कोणत्याही मोहाला बळी पडी नका. काय घडलंय पुराणामध्ये, विश्वामित्राचं हरणं झालं. ऋषीमुनी सुद्धा गेले. पण आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत..' 

 

'डोळा मारलं की जायचं नाही.. ते आपलं काम नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे.' संजय राऊतांच्या याच विधानामुळे आता अमरावतीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अमरावतीत 2019 मध्ये काय लागला होता निकाल?

1999 पासून शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघातून नवनीत राणांनी 2019 मध्ये गुलाल उधळला होता. नवनीत राणा या अपक्ष उमेदवार होत्या. पण, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने पाठिंबा दिला होता. नवनीत राणांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

नवनीत राणा यांना 5 लाख 10 हजार 947 मते मिळाली होती. तर आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 73 हजार 996 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपरे यांना 65 हजार 135 मते मिळाली होती.

नवनीत राणांचं 'ते' विधानही चर्चेत.. 

नवनीत राणा यांच्या भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या म्हणताहेत की, "ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायती सारखी लढायची आहे. 12 वाजेपर्यंत सर्व मतदार आपल्याला बुथवर न्यायचे आहेत. सर्वांनी मतदान केलं पाहिजे."

पुढे त्या म्हणाल्या की, "मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये. एवढी मोठी यंत्रणा असून 2019 मध्ये एक अपक्ष उमेदवार निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडून गेली होती", असं विधान नवनीत राणा यांनी केलं होतं.

    follow whatsapp