Modi New Cabinet 2024 : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मंत्री नसणार. दिल्लीतील खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपकडून देण्यात आलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने नाकारला आहे. नेमकं काय घडलं, याबद्दल फडणवीसांनीच खुलासा केला. (Ajit Pawar's Ncp Wants Cabinet instead of MoS independent)
ADVERTISEMENT
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण मंत्री असणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. लोकसभेची एकच जागा असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार की नाही, याबद्दलही चर्चा होती.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मंत्रिपद नाकारलं...
रविवारी (9जून) सकाळपासूनच दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, त्यांच्या नावाची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असणार आहे. पण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कुणीही मंत्री नसेल.
हेही वाचा >> "... म्हणून 'मविआ'सोबत आघाडी केली नाही", आंबेडकरांचे गंभीर आरोप
शपथविधी सोहळ्याआधी दिल्लीतील सुनील तटकरे यांच्या घरी देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांची बैठक झाली. बराच वेळ नेत्यांची चर्चा झाली. त्यानंतरही सस्पेन्स कायम होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांनीच याबद्दलचा खुलासा केला.
देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितले?
दिल्लीत माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. पण, त्यांचा आग्रह असा होता की, आमच्याकडून प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. अनेक पक्ष सोबत असतात, त्यामुळे एका पक्षासाठी तो निकष मोडता येत नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की, भविष्यात जेव्हाही मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार होईल."
मंत्रिमंडळ विस्तारात काय होणार?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता मंत्रिमंडळ विस्तारावरच अवलंबून राहावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळीही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार की, राज्यमंत्री स्वतंत्र पदभारच पदरी पडणार? कारण देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली की, 'अनेक पक्ष सोबत असतात, त्यामुळे एका पक्षासाठी तो निकष मोडता येत नाही.'
हेही वाचा >> मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी? पाहा संपूर्ण यादी
म्हणजे कमी खासदार असलेल्या पक्षांना राज्यमंत्री स्वतंत्र पदभार देण्याचाच फॉर्म्युला ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल का? याबद्दल साशंकताच आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेट दिल्यास एनडीएतील कमी खासदार असलेल्या पक्षांकडूनही तशी मागणी होऊ शकते, जी भाजपसाठी अडचणीची आहे.
ADVERTISEMENT