राज्यात मागच्या काही दिवसांप्रमाणे आजचा दिवसही राजकीय घडामोडींनी भरलेला होता. निकालानंतर 10 व्या दिवशीही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची नावं स्पष्ट झालेली नाहीत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती काहीशीा खालावलेली आहे. काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बर्षा बंगल्यावर भेट झाली. तर दुसरीकडे अजित पवार हे सध्या दिल्लीत आहेत. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज असून, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीबाहेर पडल्यानंतर शिंदेंनी आता गृहमंत्रिपदासाठी आग्रह धरल्याचं दिसतंय. मात्र, दिल्लीत गेलेले अजित पवारही आता शिंदेंच्या बरोबरीचे खाते मागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
अजित पवार कालपासून (2 डिसेंबर) संध्याकाळपासून दिल्लीत आहेत. राज्यातील सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशा परिस्थितीत अजित पवार गेल्या 24 तासांपासून दिल्लीत तळ ठोकून का आहेत? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. अजित पवार हे शिंदेंच्या तुलनेत कमी खाती घेण्यासाठी तयार नसल्याची चर्चा आहे. तसंच यादरम्यान अजित पवार अमित शाह यांचीही भेट घेणार असल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या हालचालींचा अर्थ काय हे आता पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
आम्हालाही शिंदेंच्या बरोबरीतच खाती हवी : भुजबळ
हे ही वाचा >> Mohit Kamboj Vs Gajabhau : मोहित कंबोज यांचं पुन्हा ट्विट, 'गजाभाऊ'कडून पुन्हा उत्तर, म्हणाला बापाचं नाव...
"अजित पवार आणि आमच्या आमदारांमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली हे खरं आहे. निवडणुकीच्या वेळी शिंदे गटाला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळेच त्यांचे जास्त आमदार निवडून आले. मात्र आम्हाला खूप कमी जागा मिळाल्या. स्ट्राइक रेट जर पाहिला तर, भाजप नंबर एकवर आहे, अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकावर आहे तर एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. आकड्यांमध्ये थोडाच फरक आहे. आम्ही म्हणतोय आमचा स्ट्राईक रेटही चांगला आहे. त्यामुळे आम्हाला शिंदे गटाच्या बरोबरीची जागा द्या." असं भुजबळ म्हणाले आहेत.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis meets Eknath Shinde : फडणवीसांचा ताफा वर्षा बंगल्यावर, शिंदेंच्या भेटीला जाण्याचं कारण काय?
राज्यात 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. भाजपचे दोन्ही निरीक्षक मुंबईत पोहोचले असून, जोरदार तयारी सुरू आहे. अशाच परिस्थितीत अजित पवारांनी दिल्ली न सोडल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, अजित पवार यांनी सर्वात आधी भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपली आणि त्यावरुन शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचंही दिसतंय. त्यानंतर आता अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या भूमिकेचा अर्थ काय हे आता मंत्रिपदाच्या यादीतूनच स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT