विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राज्यात राजकीय घडामोडी वेगानं वाढल्या आहेत. महायुतीला या निकालात स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना देखील मुख्यमंत्रिपदापासून ते मंत्रिपदांच्या वाटपापर्यंत अजूनही बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नसून, ते भाजपकडे जाणार असल्याचं निश्चित झाल्यापासून शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरुन सुषमा अंधारे यांनी एक ट्विट करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Mohit Kamboj Vs Gajabhau : मोहित कंबोज यांचं पुन्हा ट्विट, 'गजाभाऊ'कडून पुन्हा उत्तर, म्हणाला बापाचं नाव...
महायुतीमध्ये आता मुख्यमंत्रिपदानंतर गृहमंत्रिपदावरुनही रस्सीखेंच सुरू असल्याची चर्चा आहे. यावरुन संजय राऊत हे वारंवार महायुतीवर निशाणा साधताना दिसत आहेत. यावरुन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत हे आगीत तेल ओतण्याचं काम करत असल्याचं म्हटलं होतं. त्याला आता सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
"EVM च्या कृपेने यश आणि त्या बहुमतानंतर सत्तास्थापनेसाठी सुरू असलेली रस्सीखेंच आणि अगदी साम-दाम-दंडभेद आणि भावनिक दबाव हे फंड शिंदे वापरत आहेत. या फंड्यावर संजय राऊत यांनी अत्यंत सटीक विश्लेषण केलं. यावर गुलाबराव पाटील म्हणतायत की ते आगीत तेल टाकत आहेत. गुलाबराव... चला मान्य करु आगीत तेल टाकलंय.. म्हणजे तुम्ही हे मान्य केलं की आग लागली आहे, रान पेटलं आहे. ही आग आता 5 तारखेपूर्वी काहीही करुन ती आग विझवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुम्ही ज्यांच्या जीवावर सुरत, गुवाहाटी फिरायला गेला होतात, तेच लोक तुमच्या गळ्याभोवती ED चा दोरखंड आवळताना जराही मागे कचरणार नाहीत. बाकी नाही बहीण म्हणून काळजी वाटली... तुमचं तुम्ही ठरवा."
दरम्यान, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याचं समोर आलं आहे. ते आज ज्युपिटर रुग्णालयात चेक अपसाठी गेले होते. तर दुसरीकडे आझाद मैदानात शपथविधीची तयारी सुरू असल्याचंही दिसतं आहे. या सर्व घटनांवरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनीही जोर धरल्याचं दिसतंय. त्यामुळे 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT