Sharad Pawar vs Devendra Fadnavis: राहुरी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघा एक आठवडाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण हे अधिकाधिक तापू लागलं आहे. अशावेळी आता शरद पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. (maharashtra assembly election 2024 it doesnt take common sense to break a party why did sharad pawar this type of criticize devendra fadnavis)
ADVERTISEMENT
पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. असं म्हणत शरद पवार यांनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
'देवेंद्र फडणवीस एके ठिकाणी म्हणाले की, त्यांना प्रश्न विचारला की, तुमच्या आयुष्यात तुम्ही काय काम केलं त्यांनी सांगितलं की, फार मोठं काम केलं. दोन पक्ष फोडले. पक्ष उभा करायला अक्कल लागते, कष्ट लागतात. पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही.' असं म्हणत शरद पवार यांनी जाहीर सभेतूनच देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
हे ही वाचा>> Vidhansabha Election 2024: 'मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक...', राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य!
देवेंद्र फडणवीसांचं ते विधान नेमकं काय?
लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांना मी पुन्हा येईन... यावरून प्रश्न विचारण्यात आला. कारण 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मी पुन्हा येईन असं म्हणत पुन्हा सत्तेत सर्वोच्च स्थानी येऊ असा दावा केला होता.
मात्र, 2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण राजकीय गणित बदलली आणि फडणवीसांना सत्ता गमवावी लागली. साधारण अडीच वर्ष ते सत्तेपासून दूर राहिले. पण 2022 साली ते पुन्हा एकदा सत्तेत आले.
हे ही वाचा>> Uddhav Thackeray: 'मोदीजी तुमच्यावर काय संस्कार?, तुम्ही माँ आणि बाळासाहेबांचा...', ठाकरे बरसले!
त्यानंतर 2024 साली लोकसभा निवडणुकांच्या आधी फडणवीसांना एका मुलाखतीत मी पुन्हा येईन यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा फडणवीस असं म्हणालेले की, मी पुन्हा आलो.. पण येताना दोन पक्ष फोडून आलो.
शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार
दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या त्याच विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. पक्ष फोडायला अक्कल लागत नाही असं म्हणत पवारांनी फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पवारांच्या या टीकेला फडणवीस नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT