Maharashtra Vidhan Sabha Elections : राज्यात सध्या सर्वांचं लक्ष विधानसभा निवडणुकांवर लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व धामधुमीला कधी ब्रेक लागणार आणि निकाल कधी स्पष्ट होणार याची आता सगळेच वाट पाहत आहेत. गेल्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडलं आणि उद्या 23 नोव्हेंबरला निकाल स्पष्ट होणार आहेत. राज्यात आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या संस्थांच्या एक्झिट पोलनुसारत महायुतीचा बोलाबाला राहील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र हे सर्व अंदाज फेटाळून लावत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आमचंच येणार असून, 23 तारखेला 10 वाजेपर्यंत आम्ही मुख्यमंत्री जाहीर करु असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यानंतर मुंबईत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली देखील पाहायला मिळाल्या आहेत.
ADVERTISEMENT
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनंतर, तसंच दोन प्रादेशिक पक्ष फुटल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीतून अनेक राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे भवितव्य ठरणार आहेत. उद्या लागणाऱ्या निकालांमध्ये कुणाला कौल मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र त्यापूर्वीच आता महाविकास आघाडी आणि महायुतीने पूर्वतयारी सुरू केल्याचं कळतंय. काल महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये बैठक झाली.
हे ही वाचा >> राज्यात महायुतीचा झेंडा फडकणार! MVA ला फक्त 'इतक्या' जागा मिळणार, 'Chanakya Exit Poll'ने उडवली खळबळ
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मतदानानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदावरील वादावर चर्चा करण्यासाठी MVA नेते बैठकीला उपस्थित होते. संजय राऊत, यूबीटी सेनेचे अनिल देसाई, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि बंटी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील या बैठकीत सहभागी झाले होते. मतदानानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल देसाई, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील या बैठकीत सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे या बैठकीतून बाहेर पडताना महाविकास आघाडीचे नेते एकाच कारमधून रवाना होताना दिसले. यामध्ये विशेषत: जयंत पाटील, संजय राऊत आणि सतेज पाटील यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे तीन नेते एकाच कारमधून जाताना दिसले. विशेष म्हणजे जयंत पाटील यांच्या हातात स्टिअरींग असल्याचं पाहायला मिळालं आहे.
राज्यात समोर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार महायुतीचं सरकार येईल किंवा अटीतटीची परिस्थिती निर्माण होऊन अपक्ष किंगमेकर ठरू शकतील. त्यामुळे घोडेबाजार टाळण्यासाठीही महाविकास आघाडीचं लक्ष सर्व आमदारांवर असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यासाठीची तयारी सुरू झाली असून, मुंबईतल्या हॉटेलही त्यासाठी बूक केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच बाहेरच्या राज्यातून काँग्रेसचा एक बडा नेता महाराष्ट्रात येणार असून, त्यांच्याकडेच सर्व जबाबदारी असणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे 26 तारखेपर्यंत होणाऱ्या घडामोडींवर देशाचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT