एसटी बसमध्ये आता "शिवनेरी सुंदरी", भरत गोगावलेंनी घेतलेला निर्णय नेमका आहे तरी काय?

मुंबई तक

01 Oct 2024 (अपडेटेड: 01 Oct 2024, 11:36 PM)

Shivneri Sundari: मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये आता शिवनेरी सुंदरी असणार आहे. ज्याबाबत एस.टी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांनी निर्णय घेतला आहे.

एसटी बसमध्ये आता "शिवनेरी सुंदरी"

एसटी बसमध्ये आता "शिवनेरी सुंदरी"

follow google news

मुंबई: मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीमध्ये दिली. (shivneri sundari which will be in shivneri bus of st corporation was decided by bharat gogawale)

हे वाचलं का?

एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४ वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली. 

आनंद आरोग्य केंद्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर "आनंद आरोग्य केंद्र" या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशां बरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयची आहे. 

मूल व धारणी येथे नवे आगार निर्माण होणार

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे.

प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा

एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन१०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना  या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

    follow whatsapp