मालवणीची दंगल पूर्वनियोजित, आधी कट नंतर…; पोलिसांच्या तपासात खळबळजनक माहिती

दिव्येश सिंह

10 Apr 2023 (अपडेटेड: 10 Apr 2023, 09:23 AM)

आरोपींनी कट रचून राम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक केली, अशी नोंद पोलिसांनी त्यांच्या डायरीत केली आहे.

Malwani case of rioting : Police find that the rioting was caused as per planned conspiracy hatched by the accused involved.

Malwani case of rioting : Police find that the rioting was caused as per planned conspiracy hatched by the accused involved.

follow google news

श्रीराम नवमीच्या दिवशी मालाडमधील मालवणी परिसरात झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित दंगल होती, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. आरोपींनी कट रचून राम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक केली, अशी नोंद पोलिसांनी त्यांच्या डायरीत केली आहे. कट रचणाऱ्यांपैकी एक आरोपी अटकेत असून, दुसऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

30 मार्च रोजी राम नवमीनिमित्त मालवणी भागात शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रा एका मशिदीसमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यात्रेतील लोकांवर दगडफेक करण्यात आल्याचाही प्रकार घडला होता.

मालवणी घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेजच्या मदतीने धरपकड सुरू केली होती. पोलिसांनी 20 जणांना या प्रकरणी अटक केली होती. आता या प्रकरणात नवी आणि खळबळजनक माहिती तपासातून समोर आली आहे.

कट रचून घडवली दंगल; पोलिसांच्या डायरीत काय?

मालवणी पोलिसांच्या डायरीतील नोंदीत असं म्हटलं आहे की, या प्रकरणातील आरोपींनी जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर सवेरा हाईट्स या ठिकाणी कट रचून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून दंगल घडवून आणली.

सदर गुन्ह्यातील अटक आरोपी आणि पोलीस शोध घेत असलेला आरोपी अशा दोघांनी कट रचून घटना घडवून आणल्याचे निष्पन्न झाले असून, भादंवि कलम 120 (ब) अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे. गुन्ह्यातील फिर्यादीत आरोपींनी राम नवमीच्या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांवर चपला आणि दगड फेकले आणि अल्ला हू अकबरच्या घोषणा दिल्या, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांकडून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड?

दरम्यान, मालाडमधील मालवणी भागात पोलिसांनी काही जणांना अटक केली असून, याविरोधात समाजवादी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. समाजवादी पक्षाकडून मुंबई पोलिसांच्या कारवाई विरोधात अप्पर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी धरपकड केल्याचा दावा समाजवादी पक्षाचे मुंबईचे महासचिव कुबेर मौर्या यांनी केला आहे.

संबंधित बातमी >> मालवणीत संभाजीनगरची पुनरावृत्ती टळली! शोभायात्रेदरम्यान काय घडलं?

“आज अप्पर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आम्ही धरणे आंदोलन करणार होतो. मालवणीमध्ये राम नवमीच्या दिवशी जो उपद्रव झाला. या घटनेत पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली आहे. एका वर्गाच्या मागे पोलीस लागले आहेत. त्यांना त्रास देण्याचं काम पोलीस करत आहे. याविरोधात आम्ही धरणे आंदोलन करणार होतो. पण, हे दाबून टाकण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले आहे”, असा आरोप कुबेर मौर्य यांनी केला आहे.

    follow whatsapp