मान्सून मुंबईत दाखल झाला असून, पुढील काही काळात राज्यभर व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शनिवारी (११ जून) मान्सून मुंबईत दाखल झाला. मान्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली असून, पुढील चार दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
ADVERTISEMENT
मान्सूनने शनिवारी राज्यात पाऊल ठेवल्यानंतर विविध भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. पुढील तीन ते चार दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
“11 जून. मुंबईत मान्सूनचे स्वागत. 1 जून रोजी डहाणू, मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत व पुढे खाली दर्शविल्या प्रमाणे मान्सूनचे आगमन झाले आहे,” अशी माहिती त्यांनी मान्सूनच्या सद्यस्थितीचा नकाशा पोस्ट करत दिली आहे.
भारतीय हवामान विभागानेही याबद्दल माहिती दिली आहे. “नैऋत्य मान्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात दाखल झाला आहे. पुढील ४८ तासांत उर्वरित कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या अधिकांश भागात मान्सूनच्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.”
“कोकणातील काही भाग आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे,” असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
कोकणातील तीन जिल्ह्यांना ‘ऑरेंज अर्लट’
हवामान विभागाने १५ जूनपर्यंतचा हवामानाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यानुसार आज (११ जून) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तीन जिल्हे वगळता मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, बीड, सोलापूर, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे.
उद्या कसं असेल हवामान?
रविवारी (१२ जून) रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT