शिवसेनेच्या १२ खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे पत्र दिलं आहे. शिवसेना लोकसभा गट तयार करून हे पत्र दिलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत दिली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातली केस उद्या आहे. त्यासंदर्भातही मी दिल्लीत आलो ही माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे कोण कोणते खासदार शिंदे गटात आले आहेत?
श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमाने, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, संजय मंडलिक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित, हेमंत पाटील या सगळ्यांनी शिवसेनेचा गट तयार करून तसं पत्र अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं आहे. ही माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Eknath Shinde : “अन्यायाविरोधात पेटून उठा या बाळासाहेबांच्या विचारांवर आमची वाटचाल”
आम्ही ५० आमदारांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेने आमि शिवसेनेतल्या अनेकांनी केलं आहे. निवडणुकीच्या आधी आम्ही युती म्हणून लढलो होतो. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात जनतेचं सरकार स्थापन केलं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच १२ खासदारांनी आज जी भूमिका घेतली आणि ते आमच्यासोबत आले त्याचं मी स्वागत करतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आम्ही जी भूमिका घेतली ती सगळ्यांनाच मान्य आहे. महाराष्ट्राच्या जनतेलाही आमची भूमिका मान्य आहे. आम्ही जनहिताचेच निर्णय सरकार आल्यापासून घेतले आहे. इंधनावरचे दर कमी केले आहेत. तसंच आम्ही जे काही निर्णय घेऊ ते सर्वसामान्यांसाठीच घेऊ असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे सगळं म्हणजे कॉमेडी एक्स्प्रेस सिझन २ आहे असं म्हटं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की दुसरं कुणी बोललं असतं तर आम्ही नक्कीच दखल घेतली असती. जे बोललेत त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही ते अशीच बडबड करत असतात. मॅटनी शो सध्या बंद झाला आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. तसंच त्यांच्या बोलण्याला काय महत्त्व द्यायचं असंही म्हटलं आहे.
ADVERTISEMENT