भयंकर! इंदूरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, १३ प्रवासी जागीच ठार

मुंबई तक

• 07:03 AM • 18 Jul 2022

मध्य प्रदेशातील इंदौरवरून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे निघालेल्या प्रवासी बसवर काळाने झडप घातली. सकाळी दहा ते सव्वादहा वाजेच्या सुमारास भरधाव बस मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी दरम्यान असलेल्या पुलावरून नर्मद नदीच्या पात्रात कोसळली. यात १३ प्रवासी जागीच ठार झाले. मध्य प्रदेशातील खलघाटजवळ सोमवारी सकाळी प्रवासी बस दुर्घटनाग्रस्त झाली. ५५ प्रवाशांना घेऊन जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे येत असलेली […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

मध्य प्रदेशातील इंदौरवरून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे निघालेल्या प्रवासी बसवर काळाने झडप घातली. सकाळी दहा ते सव्वादहा वाजेच्या सुमारास भरधाव बस मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी दरम्यान असलेल्या पुलावरून नर्मद नदीच्या पात्रात कोसळली. यात १३ प्रवासी जागीच ठार झाले.

हे वाचलं का?

मध्य प्रदेशातील खलघाटजवळ सोमवारी सकाळी प्रवासी बस दुर्घटनाग्रस्त झाली. ५५ प्रवाशांना घेऊन जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे येत असलेली बस खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेवर पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरू केलं. खरगोन धारचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकानीही घटनास्थळाला भेट दिली.

पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर १५ जण जखमी अवस्थेत आढळले. बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांपैकी ५ ते ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बस अपघाताबद्दल जळगाव जिल्हाधिकारी काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची बस इंदूर-अमळनेर बस (एमएच४०, एन९८४८) सोमवारी (१८ जुलै) सकाळी ७.३० वाजता इंदूर येथून अमळनेरच्या दिशेनं निघाली होती. सकाळी १० ते १०.१५ यावेळेत बस मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी दरम्यान असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावरून जात होती. त्याचवेळी भरधाव बस पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडली, अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

खरगोन आणि धार जिल्हा प्रशासनाने क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढली असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात आहे. जखमींना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी खरगोन आणि धार जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं अभिजित राऊत यांनी सांगितलं.

नर्मदा नदीत बस कोसळली : शिवराज सिंह चौहान यांचा एकनाथ शिंदेंना फोन

अमळनेरकडे येणारी बस मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमाभागात नर्मदा नदीपात्रात कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरूये. दरम्यान, या घटनेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्राच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला.

शिवराज सिंह चौहान यांनी एकनाथ शिंदे यांना बस अपघाताची माहिती दिली. बस अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह पोहोचवण्यात येतील, अशी माहिती त्यांनी शिंदे यांना दिली. त्याचबरोबर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या मदतीचीही माहिती दिली.

स्टेअरिंग खराब झाल्याने बसचा अपघात?

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बस अपघाताबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितलं की, बसचं स्टेअरिंग खराब झाल्यानं चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. बसमधील १५ प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून, मदत व बचाव कार्य सुरूच आहे, असं मिश्रा म्हणाले.

बसचालक, वाहकासह मृतांची ओळख पटली

बस अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी काहीजणांची ओळख पटली आहे. चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक), प्रकाश श्रावण चौधरी (वाहक), चेतन राम गोपाल जांगीड (वय ७०, रा. नांगल कला, गोविंदगड, जि. जयपूर, राजस्थान), प्रकाश श्रवण चौधरी (वय ४०, शारदा कॉलनी, अमळनेर जि. जळगाव), लिंबाजी आनंद पाटील (वय ६०, पिलोदा, अमळनेर, जि. जळगाव), कमला लिंबाजी पाटील (वय ५५, पिलोदा, अमळनेर, जि. जळगाव), चंद्रकांत एकनाथ पाटील (वय ४५, अमळनेर, जि. जळगाव) या मृतांची ओळख आधार कार्ड आधारे पटवण्यात आली आहे. तर अरवा मुर्तझा बोरा (वय २७, मूर्तिजापूर, अकोला) आणि सैफुद्दीन अब्बास नुरानी नगर, इंदूर यांची ओळख नातेवाईकांच्या मदतीने पटवण्यात आली आहे.

    follow whatsapp