– पारस दामा, मुंबई प्रतिनिधी
ADVERTISEMENT
मुंबईच्या ताडदेव येथील इमारतीला लागलेल्या आगीत सात जणांना आपले प्राण गमवावे लागले. सकाळी ८ वाजल्याच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं. परंतू आगीनंतर धुराचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या या इमारतीमधील जखमींवर मुंबईच्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
परंतू यावेळी मुंबईतल्या तीन रुग्णालयांनी ताडदेव आगीतील जखमी झालेल्या रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार दिल्याची धक्कादायक बाब समोर येते आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाचा आढावा घेत हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूसही केली. पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स, मसिना आणि वोकार्ड या तीन रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार दिला.
गरजेच्या वेळी हॉस्पिटल्सच्या या भूमिकेवर किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या असून त्यांनी याप्रकरणात कारवाईचा इशारा दिला आहे. या हॉस्पिटल्सनी असं का केलं याची आम्ही चौकशी करु आणि महापालिका आयुक्तांनाही याबद्दल आम्ही सांगणार असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तीन हॉस्पिटल्सनी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना भाटीया, कस्तुरबा आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी काही रुग्णांची परिस्थिती अजुनही गंभीर असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांचे DCP सौरभ त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या १५ व्या मजल्यावर पहिल्यांदा आग लागली. यानंतर ही आग पसरत वरच्या मजल्यावर पोहचली. १९ व्या मजल्यावर आगीमुळे सर्वात जास्त नुकसान झाल्याचं कळतंय. या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. अग्निशमन दल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
ADVERTISEMENT