२६ ते २८ मार्च दरम्यान नाशिकमध्ये होणारं ९४ वं साहित्य संमेलन कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे स्थगित करण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलनाचं आयोजन करायचं नाही असा निर्णय महामंडळाने घेतला होता. परंतू नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाली. डिसेंबर-जानेवीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर महामंडळाने २६ ते २८ मार्चदरम्यान नाशिक येथे साहित्य संमेलनाचं आयोजन करत असल्याची घोषणा केली. विज्ञानकथा लेखक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
परंतू गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. नाशिकमध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढते आहे. अशा परिस्थितीत संमेलनासाठी येणारे साहित्यीक व बाहेरगावातून येणाऱ्या साहित्यप्रेमींच्या आरोग्याचा विचार करत महामंडळाने संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे. सध्या या परिस्थितीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चर्चा करुन संमेलनाबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. याचसोबत संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष व साहित्यीकांबद्दल घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचंही महामंडळाने स्पष्ट केलंय.
ADVERTISEMENT