सध्या राज्यात नवरात्र उत्सव सुरू आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरू आहे ती दसरा मेळाव्याची. कारण दुभंगलेल्या शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. एक पार पडणार आहे शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर. तर दुसरा मेळावा पार पडणार आहे तो बीकेसी मैदानावर. शिवाजी पार्कवरचा मेळावा हा उद्धव ठाकरेंचा आहे. तर बीकेसी मैदानावर होणारा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. महाराष्ट्रातलं राजकारण या दसरा मेळाव्यावरून चांगलंच तापलेलं दिसतं आहे. अशात शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर आणला आहे. विचारांचा ज्वलंत हुंकार असं टायटल देत हा टिझर आणण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हिंदुत्व आणि निष्ठा : ठाकरे आणि शिंदेंच्या दसरा मेळावा टीझरमध्ये काय आहे फरक?
काय आहे नव्या टिझरमध्ये?
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो ही बाळासाहेब ठाकरेंची साद आहे. त्यातूनच हा टिझर सुरू होतो. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातला एक अंश आहे ज्यात ते म्हणतात, “शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना म्हणून मिरवता येणार नाही. ही माझी भावना आहे. जी प्रत्येकाने जोपासली पाहिजे. सगळा महाराष्ट्र एकत्र येतो आणि विचार दिला जातो. वृत्तपत्रांमधूनही तो दिला जातो. पण प्रत्यक्ष ऐकण्यात एक मजाच असते. कुणीतरी काहीतरी पाहिल्यानंतर त्याने ते सांगणं आणि आपण प्रत्यक्ष पाहणं यात फरक पडतो.” यानंतर दुसऱ्या भाषणातला अंश वापरण्यात आला आहे.
‘मी त्याचवेळी म्हणालो होतो,…’; शिवसेना दसरा मेळावा निकालावर अजित पवार काय म्हणाले?
टिझरमधल्या बाळासाहेब ठाकरे भाषणाचा दुसरा अंश काय आहे?
“देश खतम झाला, हिंदुत्व आमचं उद्ध्स्त झालं तर देशाला वाचवायला एक मायेचा पुत येणार नाही. तो फक्त तुमच्यातलाच मर्द निर्माण होऊ शकतो आणि तो मर्द निर्माण करण्याचं काम आम्ही हिंदुत्वाच्या रूपाने करतो आहोत.” या ओळी त्यासोबत शेवटी एकनाथ शिंदे यांचे काही फोटो दिसतात.
त्यानंतर टिझरमध्ये काय ओळी येतात?
विचारांचा ज्वलंत हुंकार, भगव्याचा हा जय जयकार आम्ही विचारांचे वारसदार शिवसेना दसरा मेळावा बीकेसी बांद्रा मुंबई हे सांगितलं जातं आणि त्यानंतर हा टिझर संपतो.
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत असं एकनाथ शिंदे यांच्याकडून सातत्याने सांगितलं जातं आहे. त्याचीच प्रचिती या टिझरमध्येही येते. दसरा मेळाव्याचं जे बॅनर पोस्ट करण्यात आलं होतं तसंच मुंबई लावण्यात आलं होतं त्यातही आम्ही विचारांचे वारसदार हाच उल्लेख करण्यात आला आहे. आता दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे काय बोलणार? तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तूर्तास ठाकरे आणि शिंदे गटाकडून टिझर आणणं सुरू झालं आहे.
ADVERTISEMENT