बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या संशयास्पद मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मागच्या वर्षी याच दिवशी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला होता. सुरुवातीला मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत होते, त्यानंतर सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आला. या प्रकरणावरुन महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना रंगला. सुशांतच्या मृत्यूनंतर आज वर्षभरानेही दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.
ADVERTISEMENT
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करुन सुशांत सिंग प्रकरणात सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआयने सत्य लपवून का ठेवलं आहे? त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचं म्हटलंय.
यावेळी अँटिलीया प्रकरण आणि सचिन वाझेंना झालेली अटक या प्रकरणावरुनही सचिन सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार NIA, CBI, ED यांचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करत असल्याचं म्हटलं.
सचिन सावंत यांच्या टिकेला भाजप आमदार राम कदम यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. स्वतःच्या अपयशाचं खापर केंद्रावर कधी पर्यंत फोडणार असा प्रश्न विचारत राम कदमांनी सुशांत सिंग प्रकरणात ६५ दिवस पुरावे नष्ट करण्याचं पाप कोणी केलं असा प्रश्न विचारला आहे.
स्वतः पुरावे नष्ट करायचे आणि केंद्रावर खापर फोडायचं हे धंदे बंद करा. सरकार चालवण्यासाठी तुम्ही नालायक ठरला आहात हे मान्य करा असं म्हणत राम कदमांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. दरम्यान सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला की घातपातामुळे याबद्दल सीबीआयनेही कोणतीही ठोस माहिती दिलेली नसल्यामुळे सोशल मीडियावर सुशांतचे चाहते तपासाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
ADVERTISEMENT