नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत शेंद्रेपाडा या आदिवासी वस्तीवरील महिलांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून ओंडक्यांवरुन चालत जावं लागायचं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत या भागात लोखंडी पूल बांधून दिला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या आदिवासी पाड्यातील प्रश्नांची दखल घेत समस्या भेडसावत असलेल्या १३ ही पाड्यांपर्यंत पाणी पोहचवलं जाईल असं आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT
नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी या आदिवासी पाड्याला भेट देऊन लोखंडी पुलाची पाहणी केली. तसेच यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांशी संवाद साधून आदित्य ठाकरेंनी त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. राज्यातील दुर्गम भागात असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते, पाणी, वीज या सुविधा खरंतर आधीच पोहचायला हव्या होत्या असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आदिवासी बांधवांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. येत्या ३ महिन्यांमध्ये १३ पाड्यांना पाणी पोहचवलं जाईल असं आश्वासन आदित्यनी यावेळी दिलं.
खरशेत शेंद्रेपाडा भागातल्या आदिवासी महिला पाण्यासाठी काही फूट खोल दरी सागाच्या ओंडक्यावरुन तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या पुलावून पार करायच्या. एकीकडे महाराष्ट्रासह देश प्रगतीच्या पावलावर जात असताना दुर्गम आदिवासी भागात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण पाहून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. आदित्य ठाकरेंनी यावेळी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी तुमच्या समस्येची दखल घेतली असून, तुमच्या इतरही सर्व समस्या लवकरच सोडवल्या जातील असं आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT