अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले अब्दुल अरबाझ आणि मौलवी मुश्फाक अहमद या दोघांचीही रवानगी कोर्टाने १२ ऑगस्टपर्यंत NIA कोठडीत केली आहे. या दोघांना कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना किमान १५ दिवस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांना १२ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मा यांच्याविषयीच्या पोस्टमुळेच,पोलिसांची माहिती
NIA ने नेमकं काय म्हटलं आहे कोर्टात?
NIA ने हा देखील आरोप केला आहे की यातला एक आरोपी अरबाझने उमेश कोल्हे यांच्यावर आणि त्यांच्या घरावर तसंच त्यांच्या मेडिकलवर लक्ष ठेवलं होतं. इतर आऱोपींना पळून जाण्यास आणि लपण्यास त्याने मदत केली होती असंही NIA ने कोर्टात सांगितलं. एनआयएने सांगितले की, महाराष्ट्र पोलिसांनी सात आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना या आरोपींनी नेमकं काय केलं आहे याचा शोध लागला.
उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींची बिर्याणी पार्टी
न्यायालयाच्या चेंबरमध्ये प्रसारमाध्यमांना परवानगी नव्हती परंतु दोन आरोपींसाठी उपस्थित असलेले वकील अली काशिफ खान यांनी सांगितलं, एनआयएने न्यायालयात सांगितलं की उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर दोन्ही आरोपींनी बिर्याणी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत कोण कोण होतं याचा तपास करणं आवश्यक आहे असंही स्पष्ट करण्यात आलं.
अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांविषय़ी समर्थन करणारी पोस्ट केल्यानेच झाली. ही माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. जून महिन्यात हे प्रकरण घडलं होतं. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.
काय आहे उमेश कोल्हे यांचं हत्या प्रकरण?
पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शनी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा देत जी पोस्ट केली होती त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
उमेश कोल्हे यांचा मुलगा आणि सुनेच्या समोरच ही घटना घडली. उमेश कोल्हे यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर आता उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप होऊ लागला आहे. नुपूर शर्माला समर्थन देणारी पोस्ट उमेश कोल्हे यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवली होती असंही समोर येतं आहे.
ADVERTISEMENT