नागपूर : येथील यशोधरानगर परिसरात महिला अन् अडीच वर्षाच्या मुलावर अॅसिड हल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत महिला आणि मुलगा दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पतीच्या विवाहबाह्य संबंधामधून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणात पूजा नामक एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संतोष नगर परिसरात रुक्मिणी वर्मा (वय-२३) ही महिला राहते. तिचा पती वाहन चालक आहे. सोमवारी सकाळी कामानिमित्त ही महिला आपल्या अडीच वर्षांच्या मुलासोबत बाहेर पडली होती. त्यावेळी बुरखा घातलेल्या दोन महिलांनी त्यांच्या जवळ येत दुचाकी थांबवली आणि ॲसिडसदृश्य ज्वलनशील पदार्थ त्यांच्या दिशेने अंगावर फेकला. या अॅसिड हल्ल्यात महिला आणि तिचा मुलगा जखमी झाला आहे.
दरम्यान, घटनेनंतर तात्काळ जखमी रुक्मिणी आणि तिच्या मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनीही घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या काही तासांत पूजा नावाच्या महिलेला अटक केली असून, दुसऱ्या संशयित महिलेचा शोध घेतला जात आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पूजा ही पीडित रुक्मिणीच्या पतीची प्रियसी आहे. तिने आणि अन्य एका महिलेने मिळून हा अॅसिड हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार शौचालय साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे हे अॅसिड आहे. मात्र अधिक तपास सुरु असून संबंधित द्रव्य कुठले आहे आणि ते किती ज्वलनशील होते, याचा शोध घेण्यात येत आहे.
ADVERTISEMENT