अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. प्रदीप पटवर्धन आणि प्रशांत दामले ही मोरूची मावशी या नाटकातली गाजलेली जोडी. नाटकातला भय्यासाहेब म्हणजे प्रदीप पटवर्धन आणि मोरू म्हणजे प्रशांत दामले. तर मावशी म्हणजे विजय चव्हाण. या तिघांनी ९० च्या दशकात या नाटकाद्वारे धमाल उडवली होती. कसदार अभिनय आणि त्याला विनोदाची जोड देणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी आज एक्झिट घेतली. त्यानंतर अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्याविषयी लिहिलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
काय आहे अभिनेते प्रशांत दामले यांची फेसबुक पोस्ट?
पट्या… प्रदीप पटवर्धन…
मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या. सिद्धार्थ कॉलेज ची पाच वर्ष (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती. या घानिष्ठ मैत्रीला आज पूर्णविराम मिळाला. मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे.
पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार!
ही पोस्ट अभिनेते प्रशांत दामले यांनी केली आहे. ज्या पोस्टची चांगलीच चर्चा होते आहे. एक हरहुन्नरी कलावंत हरपला आहे. त्यामुळे मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात वास्तव्यास होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी अभिनयाचा गुण जोपासला. एकांकिकांमध्ये अभिनय करण्यापासून सुरूवात केल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटातही अनेक भूमिका साकारल्या. व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांच्या काही भूमिका फार गाजल्या. यात मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली.
प्रदीप पटवर्धन यांचे गाजलेले सिनेमे
प्रदीप पटवर्धन यांनी ‘एक फुल चार हाफ’, ‘डान्स पार्टी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘एक शोध’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘गोळा बेरीज’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘पोलीस लाईन’, ‘व टू थ्री फोर’, ‘जर्नी प्रेमाची’, ‘परिस’, ‘थँक यू विठ्ठला’ यासह अनेक सिनेमांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत.
ADVERTISEMENT