अकोला : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे सोमवारी मराठवाडा-विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान सकाळी त्यांचे अकोल्यात बाळापूर इथे आगमन झाले. यावेळी त्यांनी बाळापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच, मेहकर मतदार संघातही त्यांनी ‘शेतकरी संवाद’ सभेत हजारो शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी जाहीर सभेत उपस्थितांना एक भाराऊन टाकणारं दृश्य पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT
शिंदे गटासोबत न जाता ठाकरे गटासोबतच राहिल्याने आदित्य ठाकरे यांनी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना हजारो उपस्थितांसमोर व्यासपीठावरच मिठी मारली. यावेळी ते म्हणाले, मी आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी फिरत असेन, त्यांच्या बांधावर जात असेन. पण आज बाळापूरची सभा ही नितीनजींसाठी घेतली आहे. ते आमच्यासोबतच खांद्याला खांदा लाऊन लढणारे शिवसैनिक आहेत. ज्यांनी स्वतःला विकलं नाही, स्वतःचा मान, सन्मान विकला नाही, त्या निष्ठावंत आमदाराला मिठी मारण्यासाठी आलो आहे.
यानंतर आदित्य ठाकरे यांनी नितीन देशमुख यांना समोर बोलवत त्यांना मिठी मारली. त्यांचा हात हातात घेऊन उपस्थितांना अभिवादनही केलं. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, हे तेच आमदार आहेत, ज्यांना आधी सुरतला पळवून नेलं. पण ते तिथून गुवाहटीला गेले नाहीत. ते मात्र सूरतहूनच निघून आले. गद्दार विकले गेले, पण नितीन देशमुख विकले गेले नाहीत, असंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी व्यासपीठावर नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी याला प्रश्न विचारला. तुझे बाबा विकले गेले असते आणि 50 खोके मिळाले असते. मग आजचा दिवस चांगला की खोके चांगले? यावर नितीन देशमुख यांच्या मुलाने आजचा दिवस चांगला असं उत्तर दिलं आहे. शिंदे गटाने सुरला पळवून नेत गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT