सीआयडी मालिका पाहून पुण्यात दोन अल्पवयीन आरोपींनी ७० वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हिंगणे खुर्द येथील 70 वर्षीय महिलेच्या खूनाप्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 तारखेला सायली हाईटस फ्लॅट नं. 7 हिंगणे खुर्द येथील एका घरामध्ये चोरी झाली असुन घरामध्ये वयस्कर महिला जखमी आणि बेशुध्द अवस्थेत पडली आहे. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता 70 वर्षीय शालीनी बबन सोनवणे यांना पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतू रुग्णालयात पोहचल्यावर उपचाराआधीच डॉक्टरांनी सोनावणे यांना मृत घोषित केलं. सोनावणे यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्या कपाटातील दागदागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याचं पोलिसांना समजलं.
ज्या इमारतीत ही घटना घडली तेथील रोकडोबा मंदिराजवळ काही लहान मुलं खेळत होती. त्यांच्याजवळ चौकशी केली असता मुलांनी, सांगितले की,दुपारी पाणी पुरी खायला जाताना, त्याचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते. पोलिसांनी यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता दोन्ही मुलं घाईगडबडीत निघून जाताना पोलिसांना दिसली. यानंतर चौकशीसाठी दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं असता त्यांनी तपासात गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींचं शालिनी सोनावणे यांच्या घरी येणं-जाणं असायचं. सोनावणे यांच्या घरात खूप पैसे आहेत आणि त्या पैसे कुठे ठेवतात हे या दोन लहान मुलांनी पाहिलं होतं. सोनावणे फारशा घराबाहेर पडत नसल्यामुळे दीड-दोन महिन्यापासून त्यांनी योजना आखली होती. टेलिव्हीजनवरील सीआयडी ही मालिका पाहून दोन्ही आरोपींना चोरी करण्याची कल्पना सुचली. ठरवल्याप्रमाणे ३० तारखेला दोन्ही अल्पवयीन आरोपी सोनावणे यांच्या घरी गेले, त्यावेळी सोनावणे या टीव्ही पाहत घरात बसल्या होत्या.
धक्कादायक! गर्भवती पत्नीला जिवंत जाळलं, अर्भकाचा मृत्यू
यानंतर दोन्ही लहान मुलं काहीकाळ सोनावणे यांच्यासोबत टीव्ही पाहत बसले. संधी मिळताच दोन्ही आरोपींनी सोनावणे यांना धक्का देत खाली पाडलं आणि यानंतर तोंड आणि नाक दाबून त्यांचा खून केला. खून करत असताना पुरावा हाती सापडू नये म्हणून दोन्ही आरोपींनी हातात ग्लोव्ह्ज घातले होते. सोनावणे यांची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांच्या घरातील ९३ हजार रोख रक्कम, ६७ हजार ५०० रुपयांचे दागिने असा १ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT