आता रामदास कदमांचा ‘लेटर बॉम्ब’: उद्धव ठाकरेंना पाठवलं सहा पानांचं पत्र; म्हणाले…

मुंबई तक

• 08:45 AM • 15 Oct 2021

एक काळ असा होता की रामदास कदम हे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या जवळ असायचे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत खास राजकीय संबंध असलेल्या नेत्यांमध्ये रामदास कदम हे नावही महत्त्वाचं होतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून खासकरून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रामदास कदम हे दुरावले गेले आहेत. शिवसेनेपासून आणि उद्धव ठाकरेंपासूनही असंच म्हणता येईल. महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांची तक्रार […]

Mumbaitak
follow google news

एक काळ असा होता की रामदास कदम हे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या जवळ असायचे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत खास राजकीय संबंध असलेल्या नेत्यांमध्ये रामदास कदम हे नावही महत्त्वाचं होतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून खासकरून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रामदास कदम हे दुरावले गेले आहेत. शिवसेनेपासून आणि उद्धव ठाकरेंपासूनही असंच म्हणता येईल. महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांची तक्रार करणारं एक पत्र त्यांनी लिहिल्याचं समोर आलं आहे. हे पत्र 6 ऑक्टोबरला पाठवण्यात आलं असलं तरीही ते आज म्हणजेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या दिवशी समोर आलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे पत्रात?

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात अनिल परब यांच्यावरील आरोपांच्यासंदर्भातली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्याचा उल्लेख आहे. या कथित क्लिप बाबत रामदास कदम यांनी त्यांची बाजू मांडली आहे.

एवढंच नाही तर शिवसेनेतले काही मंत्री आपल्याला साईडलाईन करत आहेत असं म्हणत रामदास कदम यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. शिवसेनेत ज्यांना मंत्री पदं मिळाली आहेत असे काही मंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर हा माझ्यासारख्या जुन्या नेत्यांना संपवण्यासाठी करत आहेत असंही यात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला पक्षात दुर्लक्षित केलं गेलं असल्याने आपण नाराज आहोत असंही रामदास कदम यांनी पत्रात मांडल्याचं समजतं आहे.

रामदास कदम यांची प्रकृती बरी नाही

शिवसेना नेते रामदास कदम हे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती चांगली नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रामदास कदम यांच्यावर उपचार सुरू आहेत. रामदास कदम यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर दोन महिने घरी उपचार सुरू होते. कोणत्याही इन्फेक्शनची लागण होऊ नये म्हणून त्यांना गर्दी मध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला येऊ शकणार नाही असंही रामदास कदम यांनी पत्राद्वारे कळवलं आहे असं समजतं आहे.

गेल्यावर्षीही अनुपस्थिती

रामदास कदम यांची दसरा मेळाव्यात गेल्यावर्षीही अनुपस्थिती होती. कदाचित नाराजीमुळेच ते दसरा मेळाव्याला उपस्थित राहिले नसावेत अशा चर्चा होत्या. आताही त्यांना बोलावलं गेलं नाही असं सांगण्यात येत होतं. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे त्यांना निमंत्रण नाही असं समजत होतं. मात्र रामदास कदम यांनी आता स्वतःच आपण येणार नसल्याचं कळवलं आहे.

त्यांच्याशी फोनवर जेव्हा चर्चा कऱण्यात आली तेव्हा रामदास कदम म्हणाले की मला माहित नाही की अशा प्रकारच्या बातम्या नेमक्या कुठून आल्या आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे. त्या हक्काने मी दसरा मेळाव्याला जाऊ शकतो त्यासाठी मला निमंत्रणाची, कुठल्याही पासची गरज नाही. मात्र माझी प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांनी मला डिसेंबर महिन्यापर्यंत कुठेही गर्दीमध्ये जाऊ नका असा सल्ला दिला आहे. या वैद्यकीय सल्ल्यामुळे मी दसरा मेळाव्याला जाणार नाही असंही रामदास कदम यांनी मुंबई तकला सांगितलं आहे.

उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत रामदास कदम

शिवसेना नेते रामदास कदम कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपामुंळे नाराज आणि व्यथित असल्याची माहिती आहे. रामदास कदम यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बाजू मांडली आहे. पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा रामदास कदम यांनी पत्रात केला असल्याचं कळतंय. रामदास कदम यांनी आपल्या वेदना उद्धव ठाकरेंपुढे पत्राद्वारे मांडल्या आहेत. आठवडाभरात उद्धव ठाकरेंना व्यक्तिशः भेटून रामदास कदम आपल्या भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यंदा 1300 शिवसैनिक उपस्थित असणार आहेत असं समजतं आहे. राज्यातील इतर शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांचं भाषण फेसबुक लाईव्ह द्वारा पाहता येणार आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार कथित ऑडिओ क्लिप मुळे रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यात रामदास कदम यांना एन्ट्री नसेल असं बोललं जातं होतं. कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करुन रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतं. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र आता दसरा मेळाव्याला येणार नाही असं रामदास कदम यांनी स्वतःच स्पष्ट केलं आहे.

कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी देखील शिवतीर्थाऐवजी त्याच्या जवळच असलेल्या वीर सावरकर सभागृहामध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा पार पडला होता.

    follow whatsapp