“माफी मागितली जाणार नाही”, अजित पवारांचा रौद्रवतार, विधानसभेत काय घडलं?

भागवत हिरेकर

02 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:12 PM)

Ajit Pawar Reaction on ram satpute statement about sharad Pawar : राज्यपालांच्या अभिभाषणांवरील प्रस्तावावर बोलत असताना जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) विधानावर आक्षेप घेत भाजपच्या नेत्यांनी गोंधळ सुरू केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना लक्ष्य केलं. त्याला उत्तर देताना राम सातपुतेंनी शरद पवारांचा (Sharad Pawar) एकेरी शब्दात उल्लेख केला. त्यानंतर […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

Ajit Pawar Reaction on ram satpute statement about sharad Pawar : राज्यपालांच्या अभिभाषणांवरील प्रस्तावावर बोलत असताना जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) विधानावर आक्षेप घेत भाजपच्या नेत्यांनी गोंधळ सुरू केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना लक्ष्य केलं. त्याला उत्तर देताना राम सातपुतेंनी शरद पवारांचा (Sharad Pawar) एकेरी शब्दात उल्लेख केला. त्यानंतर सभागृहात गदारोळ सुरू झाला. माफी मागण्याची मागणी विरोधकांनी केली. याच मुद्द्यावरून सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवारांचा (Ajit Pawar) रौद्रवतार बघायला मिळाला.

हे वाचलं का?

राज्यपालांच्या अभिभाषणांवर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना ओबीसी जनगणना करण्याचा ठराव मांडला गेला. विरोधकांसह तो बहुमताने मंजूर करण्यात आला, मग आता रखडलं कुठे?”, असा सवाल त्यांनी केला.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, “मला काशीरामजींची एक घोषणा आठवतेय की, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी’. आम्हाला तुम्ही पाच हजार वर्षे मागे ठेवलं, तर आम्हाला द्या. आता तुम्ही काहीतरी नवीन सनातन धर्म हमारा धर्म है और ब्राह्मण और गाय को प्रोटेक्शन देना ही हमारा कर्तव्य है, असं म्हणत मुख्यमंत्री भाषणं द्यायला लागले. योगी आदित्यनाथांनी जाहीर भाषणात सांगितलं. आम्हाला हा धर्म मान्य नाही”, असं आव्हाड म्हणाले.

त्यानंतर भाजपच्या आमदारांनी जातीवाद काढू नका म्हणत यावर आक्षेप घेतला. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जातीवाद का काढायचा नाही. आमच्या जातींवर अन्याय होत असेल, तर आम्ही सहन करायचा का?”, असं आव्हाड म्हणाले.

शरद पवार संजय राऊतांच्या पाठिशी! सत्ताधाऱ्यांना दिला इतिहासाचा दाखला

जितेंद्र आव्हाड राम सातपुतेंना काय म्हणाले?

“माझ्याविरुद्ध राम सातपुते सर्वात जास्त बोलत होते. राम सातपुते, आपण ज्या मतदारसंघातून निवडून येता, तो राखीव आहे. तो राखीव कुणामुळे आहे माहितीये? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे. तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत होता, तो धर्म असता, तर तुम्ही इथे चाकरी करत सापडले असता. इथे तुम्ही आमदार म्हणून आले नसते.

राम सातपुतेंचं जितेंद्र आव्हाडांना उत्तर, म्हणाले…

दलित आमदार म्हणून मला जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीने हिणवत आहेत, हे चुकीचं आहे. हो, मी दलित आहे. मी हिंदू दलित आहे. माझ्या बापाने चपला शिवल्या त्याचा मला अभिमान आहे. अजून एक सांगतो, हो मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे. मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलेलं. मी हिंदू दलित असल्याचा अभिमान आहे. मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतला याचा मला अभिमान आहे. हे चाकरी करत असतील, यांनी मला शिकवू नये. गर्व से कहो हम हिंदू है, दलित आमदारांचा असा अपमान करता याची लाज वाटली पाहिजे.

VIDEO: कसब्याचा निकाल लागताच अजित पवारांनी केली CM शिंदेंची नक्कल

शरद पवारांचा एकेरी उल्लेख… जयंत पाटलांनी केली माफीची मागणी

जयंत पाटील म्हणाले, “प्रश्न रेकॉर्डवरून काढून टाकण्याचा नाही. आमचे नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करण्याचा आहे. राम सातपुते यांनी एकेरीत उल्लेख केला. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्याशिवाय हे थांबणार नाही. आमच्या सर्वोच्च नेत्याचा अपमान केलेला आहे.”

आम्हीही बाबासाहेबांमुळेच इथे आहोत… भुजबळांनी सुनावलं

छगन भुजबळ म्हणाले, “मी इअरफोन लावून ऐकत होतो. आव्हाड म्हणाले, बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून तुम्ही इथे आलात. आम्ही सुद्धा त्यांच्यामुळे आलो. हे खरंच आहे. हे सभागृह, ही लोकशाही बाबासाहेबांनी घटना लिहिली त्यामुळेच आहे. त्यात चुकीचं काही कारण नाही. तर ते म्हणाले, की हो हो बाबासाहेबांमुळे तुमच्या शरद पवारामुळे नाही आलो. त्यामुळे गोंधळ झाला.”

राम सातपुतेंचं विधान; अजित पवार विधानसभेत काय म्हणाले?

विरोध पक्षनेते अजित म्हणाले, “प्रत्येकाला आपल्या वरिष्ठांचा अभिमान असतो आणि तो असला पाहिजे. मी ऐकायला नव्हतो, पण एकेरी उल्लेख झाला, असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. जर झालेला असेल, तर फक्त काढून टाकायचं नाहीये. हे नवीन पायंडे पडतील. उद्या सत्ताधारी पक्षाच्या भावना भडकतील, अशा प्रकारे… त्याचेही वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल कुणी दुसरं बोललं तर शब्दाने शब्द वाढत जाईल. ते तपासायचं ते संध्याकाळी तपासा… काढायचा निर्णय घ्यायचा तो घ्या. पण, सातपुतेंनी एकेरी उल्लेख केलेला आहे. त्यांनी माफी मागावी आणि विषय संपवावा.”

“या सभागृहात मी अनेकदा विरोधी पक्षनेता म्हणूनही माफी मागितली आणि सभागृह व्यवस्थित पुढे चालू ठेवलं. याच्यात काहीही अपमान होण्याचं कारण नाहीये”, असं अजित पवार म्हणाले.

त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, “मी तपासून घेतो आणि तसा उल्लेख केलेला असेल, तर काढून टाकू.”

त्यावर अजित पवार म्हणाले, “जर असे पायंडे पडणार असतील, तर मी आधीच तुमच्या लक्षात आणून देतो की इकडच्या बाजूनेही वेगवेगळ्या वरिष्ठांबद्दल अशा प्रकारे वाक्यरचना केली जाईल. माफी मागितली जाणार नाही. आम्ही म्हणू तपासा आणि काढायचं असेल, तर काढा आणि ठेवायचं असेल, तर ठेवा.

या नवीन गोष्टी करू नका. अध्यक्ष महोदय माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही यामध्ये… त्यांना काहीही वाटण्याचं कारण नाही. शेवटी वरिष्ठ नेत्यांचा… आम्ही जसं समोरच्यांच्या नेत्यांचा आदर करतो, तसं त्यांनी पण आमच्या नेत्यांचा आदर केला पाहिजे. त्यांची (शरद पवार) आजपर्यंतची परंपरा… कामाची पद्धत… त्यांच्याबद्दल (शरद पवार) देशाच्या पंतप्रधानांनी केलेली वक्तव्ये आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात आहे. असं असताना तुम्ही म्हणत आहात की तपासून बघतो. त्याच्यामध्ये या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

त्यानंतर आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली आणि राम सातपुते यांनी माफी मागितली. ते म्हणाले, “यांच्या जे मनात आहे, ते मी करतो. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून हे झालं असेल तर… मी पहिल्या टर्मचा आमदार आहे. त्यामुळे मी या सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो”, असं राम सातपुते म्हणाले.

    follow whatsapp