बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना सोशल मीडियावर सातत्यानं घराणेशाहीवरून लक्ष्य केलं जातं. घराणेशाहीवरून होणाऱ्या टीकेला अभिनेत्री आलिया भट्टने उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ब्रह्मास्त्र सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया भट्टने मिड डेसोबतच्या मुलाखतीत घराणेशाहीवरून ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं. ‘जर त्यांना काही लोक आवडत नसतील, तर त्यांनी त्यांचे सिनेमे बघणं बंद करावं.’
घराणेशाहीवरून होणारी टीका आणि ट्रोलिंगचा सामना कसा करते? असा प्रश्न आलिया भट्टला विचारण्यात आला होता. आलिया भट्ट म्हणाली, ‘याला सामोरं जाण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे संयम ठेवून मी स्वतः स्थान सिद्ध करू शकते. मला वाटतं की माझ्या चित्रपटांतून या ट्रोलर्सच तोंड बंद करू शकते. त्यामुळे प्रतिक्रियाच द्यायची नाही आणि वाईटही वाटून घ्यायचं नाही.’
ट्रोल केल्यावर वाईट वाटायचं -आलिया भट्ट
ट्रोलिंग बद्दलचा अनुभव सांगताना आलिया भट्ट म्हणाली, ‘मला वाईटही वाटायचं. ज्या कामामुळे लोक तुमच्यावर इतकं प्रेम करतात. तुमचा सन्मान करतात. त्यासाठी वाईट वाटणं खूपच छोटी किंमत मोजण्यासारखं आहे. मी गप्प राहते. माझं काम करते आणि घरी निघून जाते.’
‘मी गंगुबाई काठियावाडी सारखे चित्रपट केले. बोलून मी माझा बचाव करू शकत नाही. जर तुम्हाला मी आवडत नसेन, तर तुम्ही माझे चित्रपट आणि मला बघू नका. यापेक्षा जास्त मी काय करू शकते”, असं आलिया भट्ट टीकाकारांना म्हणाली.
आलिया भट्ट लोकांच्या मतांबद्दल काय म्हणाली?
लोकांबद्दल आलिया भट्ट म्हणाली, ‘लोकांकडे नेहमीच बोलण्यासाठी काही ना काही असतं. मला आशा आहे की मी माझ्या सिनेमातून हे सिद्ध करू शकेन की, जे माझं स्थान आहे त्या जागेसाठी मी लायक आहे.’
‘माझा जन्मच या कुटुंबात झालाय, तर ते मी कसं ठरवू शकते. माझ्या पालकांचं प्रोफेशन काय असावं, हे मी कसं ठरवू शकते. माझ्या वडिलांनी उपसलेल्या कष्टांबद्दल मी लाज वाटून घ्यावी, अशी तुमची इच्छा आहे का? हो, मला गोष्टी सहज मिळाल्या, पण मी माझ्या कामात भरपूर कष्ट घेते”, असं आलिया भट्ट म्हणाली.
‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूरसोबत दिसणार आलिया भट्ट
आलिया भट्ट अलिकडेच डार्लिंग्ज सिनेमात दिसली. जसमीत के रीन दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्टसह शेफाली शाह आणि विजय वर्माच्या भूमिका आहेत. सध्या आलिया भट्ट ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंदी बरोबरच तमिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड या प्रादेशिक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.
ADVERTISEMENT