अमरावती : ‘५० खोके’च्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादावर आमदार रवी राणा यांनी पडदा टाकला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. त्यांचे आदेश महत्त्वाचे आहेत. बोलण्याच्या नादात माझ्याकडून काही शब्द गेले. त्यामुळे बच्चू कडू आणि काही मंत्री, आमदार नाराज झाले. पण माझ्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागतो.” असं राणा म्हणाले होते.
ADVERTISEMENT
त्यानंतर बच्चू कडू यांनी मात्र सस्पेन्स कायम ठेवला आहे. आपण अमरावतीमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करु आणि १ नोव्हेंबर रोजी भूमिका स्पष्ट करु, असं बच्चू कडू म्हणाले. आता त्यांच्या या विधानानंतर तयार झालेला सस्पेन्स अखेर आज संपण्याची शक्यता आहे. आज टाउन हॉल जवळील नेहरू मैदानावर सकाळी ११ वाजता बच्चू कडू यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत दिव्यांग व्यक्तीच्या माध्यमातून आमची भूमिका स्पष्ट करू, असं त्यांनी सांगितलं आहे.
“मै झुकेंगा नही…”
दरम्यान, आजच्या सभेपूर्वी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये “मै झुकेंगा नही” असे बॅनर लावून आमदार रवी राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. दिलगिरी व्यक्त करायला लावून या वादात एक प्रकारे बच्चू कडू यांचा विजय झाल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना माघार घ्यावी लागली नाही, तर रवी राणा यांना माघार घ्यायला लावली असही कार्यकर्ते म्हणाले.
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केल्यानंतर कडू आणि राणा यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी ५० खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली. ५० खोके कुणी घेतले आणि कुणी दिले याचे पुरावे द्यावेत अन्यथा १ नोव्हेंबरला व्हिडीओ बाहेर आणू, असा इशारा दिला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा वेगळा विचार करू असंही कडू म्हणाले होते.
बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले :
बच्चू कडू यांना क्लिन चीट देताना देवेंद्र फडणवीस यांनी कडू यांची शिंदे गटासोबत गुवाहटीला जाण्याची इनसाईड स्टोरीही सांगितली. ते म्हणाले, बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले होते. मी स्वतः त्यांना फोन केला. मी त्यांना सांगितलं की, आम्हाला सरकार बनवायचं आहे आणि तुम्ही आमच्यासोबत हवे आहात. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या गटात यावं. त्यानंतर ते गुवाहटीला गेले.
बच्चू कडू यांनी कोणाशी सौदा केला आणि काही उलटं-सुलटं केलं हे म्हणणं चुकीचं आहे. बाकी इतरांचं मी म्हणतं नाही. पण याचा अर्थ इतरांनी काही सौदा केला असा होतं नाही. पण माझ्या फोनवर गेलेले नाहीत. माझ्या फोनवर गेलेले बच्चू कडू हे एकमेवचं, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT