मुंबई : अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाकडून ऋतुजा रमेश लटके यांनी अर्ज दाखल केला. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी अर्ज दाखल केला. या निमित्तानं पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये राजकीय सामना बघायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, लटके यांनी अर्ज दाखल केला असला तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘प्लॅन बी’ नुसार संदीप नाईक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर ऐनवेळी उमेदवारीची अडचण येऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. छाननीनंतर लटकेंचा स्वीकारला गेल्यानंतर संदीप नाईक त्यांचा अर्ज मागे घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोण आहेत संदीप नाईक?
संदीप राजू नाईक हे मुंबई महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ८१ मधून शिवसेनेचे नगरसेवक होते. ठाकरे गट आणि रमेश लटके यांच्या ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. रमेश लटके आमदार असताना त्यांची सर्व कामं संदीप नाईक बघायचे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर आणि लटके यांच्या निधनानंतरही त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नव्हती.
कालपर्यंत लटके यांचा सरकारी नोकरीतील राजीनामा मंजूर झाला नव्हता. त्यामुळे ठाकरेंकडून दुसऱ्या नावांवर विचार सुरु होता. त्यातही संदीप नाईक यांचं नाव आघाडीवर होते. लटके कुटुंबीयांकडूनही नाईक यांच्या नावाला संमती देण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लटके यांचा राजीनामा स्वीकारला गेल्यानं नाईक यांना प्लॅन बी मध्ये ठेवण्यात आले आहे.
अडथळ्यांची शर्यत पार करून ऋतुजा लटके मैदानात
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी ऋतुजा लटके यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिका प्रशासनानं मंजूर केला नाही. त्याविरोधात त्यांना उच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं होतं. महापालिका प्रशासनावर शिंदे सरकारकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, उच्च न्यायालयाने राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिल्यानं लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला.
ADVERTISEMENT