अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली गेली आहे. या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्हीसाठी ही निवडणूक म्हणजे लिटमस टेस्ट मानली जाते आहे.
ADVERTISEMENT
नितेश राणे यांनी उडवली मशाल चिन्हाची खिल्ली
भाजपचे आमदार नितेश राणे हे आज निवडणूक अधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या मशाल या चिन्हाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी मशाल चिन्हाची खिल्ली उडवली. नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह म्हणजे मशाल नसून तो आइस्क्रिमचा कोन आहे. उद्धव ठाकरेंचं चिन्ह मशाल असूच शकत नाही. निवडणूक आयोगालाही कळलं की हा थंड माणूस आहे त्यामुळे आईस्क्रिमचा कोनच त्यांना चिन्ह म्हणून दिला आहे.” असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि मशाल चिन्हाची खिल्ली उडवली आहे.
उद्धव ठाकरे म्हणजे थंड माणूस
उद्धव ठाकरे हा माणूस थंड पडला आहे. आग पूर्णपणे विझलेली आहे. निवडणूक आयोगालाही कदाचित हे लक्षात आलं असेल थंड माणूस आहे त्यामुळेच आता चिन्ह म्हणून आईस्क्रिमचा कोन दिला. आता तो आणि त्याचा मुलगा कोन घेऊन फिरतील असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही टोला लगावला आहे.
शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर दोन गट पडले. या दोन्ही गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेल्यानंतर शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण हे दोन्ही गोठवण्यात आलं. यानंतर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलं आहे चिन्ह म्हणून मशाल दिली आहे. दुसरीकडे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे तर चिन्ह म्हणून ढाल तलवार दिली आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं. आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या मशाल या चिन्हाची खिल्ली उडवली आहे.
ADVERTISEMENT