गर्दी जमवून लोक आपल्याच बाजूनं आहेत, असं सांगण्यात ठाकरे-शिंदेंमध्ये चढाओढ लागलीये. दसरा मेळाव्यावरून तर दोघांमध्ये गर्दीची स्पर्धाच रंगलीये. पण दोघांच्या ताकदीची खरी टेस्ट होणाराय, ती अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत!
ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या बंडाळीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. आणि ठाकरेंच्या बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मुंबईत ही निवडणूक होतेय. त्यामुळे ४० आमदार, १२ खासदार सोडून गेल्यावर ठाकरेंसाठी ही निवडणूक जिंकणं प्रतिष्ठेचं बनलंय. या निवडणुकीत ठाकरेंचं भवितव्य ठरवणारे तीन फॅक्टर महत्त्वाचे आहेत. याच फॅक्टरबद्दल जाऊन घेऊयात..
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान, तर ७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. १४ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शिवसेना आमदार रमेश लटकेंच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होतेय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ऋतुजा लटकेंना उमेदवारी जाहीर केलीय.
Andheri east by poll : अंधेरी पूर्वची जागा एकनाथ शिंदेंनी भाजपला का सोडली? ही आहेत 3 कारणं
दुसरीकडे भाजपकडून मुरजी पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. शिंदे गटाने निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याचं म्हटलं जातंय. याच वस्तुस्थितीच्या आधारावर पोटनिवडणुकीत तीन फॅक्टर मॅटर करणार आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : सहानुभुतीचा फॅक्टर
अंधेरी पोटनिवडणुकीत मॅटर करणारा पहिला फॅक्टर आहे सहानुभुतीचा. धडाडीचा शिवसैनिक, तरुण आमदार अशी ओळख असलेल्या रमेश लटकेंचं अकाली निधन झालं. इथे उद्धव ठाकरेंनी लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिलीये.
एखाद्या आमदार, खासदाराचं अकाली निधन झालं, आणि तिथे त्यांच्या कुटुंबातला उमेदवार रिंगणात असेल, तर त्याच्यासाठी सहानुभुतीचा फॅक्टर काम करतो. पण या फॅक्टरवर मात करत भाजपने पंढरपूर पोटनिवडणुकीत भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांचा पराभव केला होता. त्याची इथे पुनरावृत्ती होणार की देगलूर, कोल्हापूर उत्तरचा ट्रेंड कायम राहणार हे बघावं लागेल.
दुसरा फॅक्टर आहे, मराठी मतांचा टक्का
अंधेरी पूर्व मतदारसंघ मुंबईच्या उपनगरात येतो. उपनगरात निवडणुकीच्या राजकारणात मराठी माणसांएवढाच अमराठी टक्का निर्णायक आहे. अंधेरीत सुमारे पावणे तीन लाख मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख मतदार मराठी आहेत. त्यानंतर उत्तर भारतीय जवळपास ५५ हजार, मुस्लिम ३८ हजार, गुजराती/राजस्थानी ३५ हजार, दक्षिण भारतीय २० हजार आणि ख्रिश्चन १५ हजार आहेत.
थोडक्यात काय, तर लाखभर मराठी, लाखभर अमराठी मतं आहेत. मराठी मतांमध्ये फाटाफूट झाली, तर त्याचा फटका ठाकरेंना बसू शकतो. त्यामुळे ठाकरेंची सारी भिस्त ही मराठी मतांच्या एकजुटीवरच अवलंबून आहे.
तिसरा फॅक्टर आहे, काँग्रेसची पारंपरिक मतं
अंधेरीत गेल्या दोन निवडणुकीत शिवसेना जिंकत असली, तरी हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सलग तीनवेळा इथून काँग्रेस उमेदवार सुरेश शेट्टी विजयी झालेत. २०१९ मधे रमेश लटकेंना ६२ हजार, अपक्ष मुरजी पटेलांना ४५ हजार आणि काँग्रेसच्या अमिन कुट्टींना २८ हजार मतं मिळाली.
अवघ्या १७ हजार मतांनी रमेश लटके जिंकले होते. मराठी मतं लाखभर असूनही पटेलांनी टफ फाईट दिली. याच कारण युती असूनही भाजपनं आतून पटेलांसाठी काम केल्याचं म्हटलं जातं. आता हेच पटेल भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.
यंदा भाजप आणि ठाकरेंमध्ये सरळ लढत आहे. अशावेळी काँग्रेसची पारंपरिक मतं निर्णायक ठरतात. मराठी आणि अमराठी दोन लाख मतं वगळल्यास जवळपास ५३ हजार मतं मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची आहेत. त्यामुळे ठाकरेंचा उमेदवार मविआ (महाविकास आघाडी) म्हणून रिंगणात उतरतो की शिवसेना म्हणून यावरच विजयाचं सारं गणित अवलंबून आहे.
ADVERTISEMENT