अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : बावनकुळे, शेलारांची अमित शाहांसोबत दिल्लीत खलबतं

मुंबई तक

• 05:11 PM • 06 Oct 2022

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेसाठी झगडा सुरू असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागली आहे. ठाकरेंसाठी महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक भाजपनंही मनावर घेतल्याचं दिसतंय. या निवडणुकीच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. […]

Mumbaitak
follow google news

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेसाठी झगडा सुरू असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागली आहे. ठाकरेंसाठी महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक भाजपनंही मनावर घेतल्याचं दिसतंय. या निवडणुकीच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर आलाय.

हे वाचलं का?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिलीये. शिंदे गट कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता असताना भाजपकडून या जागेवर उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे पक्षफुटीनंतर ही जागा जिंकून भाजप उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या प्रयत्नात असल्याचं राजकीय घडामोडींवरून दिसतंय.

चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांनी घेतली अमित शाहांची भेट

महाराष्ट्र भाजपचं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची ही पहिलीच निवडणूक आहे. तर आशिष शेलार यांचीही मुंबई अध्यक्षपद मिळाल्यानंतरची पहिली निवडणूक. त्यामुळे दोन्ही नेत्यांकडून अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Andheri East bypoll : पोटनिवडणुकीत उमेदवार नसताना एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केलीये?

त्याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरतेय. अमित शाह, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांचा फोटो समोर आलाय आणि अंधेरी पूर्वची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.

सत्तांतरानंतर राज्यात विधानसभेची आणि प्रत्यक्ष लोकांकडून निवडून दिल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची पहिली निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकणं जितकं ठाकरेंसाठी महत्त्वाचं आहे, तितकंच भाजपसाठीही. त्याचसंदर्भात भाजप नेते आणि अमित शाह यांच्यात महत्त्वाची खलबतं झाल्याची माहिती सांगण्यात येतंय.

अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा विजय झाल्यास जनमत ठाकरेंच्या बाजूने असल्याचा संदेश जाऊ शकतो. त्याचा परिणाम भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवरही होऊ शकतो. तर दुसरीकडे ही निवडणुक भाजपनं जिंकल्यास जनमानस सत्तांतराच्या बाजूने असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

उद्धव ठाकरे की, एकनाथ शिंदे… जनतेच्या कोर्टात कुणाचा दसरा मेळावा ठरला भारी?

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात लागलेली पोटनिवडणूक आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमुळे आपण वेगळं झाल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. मात्र, मोठी फूट पडल्यानंतर आणि सत्तांतर झाल्यानंतरही राज्यात महाविकास आघाडी कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे भाजप-शिंदे गट या निवडणुकीत एकत्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने शिवसेना ही जागा राखण्यात यशस्वी ठरणार की, भाजपची रणनीती यशस्वी होणार, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp