१०० कोटींच्या वसुली प्रकरणात ED च्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढत जाण्याची चिन्ह दिसत आहेत. ED ने कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये, अनिल देशमुख कॅबिनेटमध्ये असताना बदल्यांसाठी उत्सुक असलेल्या पोलीस अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची यादी पाठवायचे असा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
अनिल देशमुखांनी आपण ही यादी गृह मंत्रालयाचे अतिरीक्त गृह सचिव आणि Police Establishment Board च्या प्रमुखांना पाठवत असल्याचं मान्य केल्याचाही दावा ED ने केला आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील अटकेत असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेला १६ वर्षांनी पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्याबाबत अनिल देशमुखांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं ईडीने म्हटलं आहे. सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन वाझेला मुंबई पोलिसांच्या Crime Intelligence Unit (CIU) विभागाचं प्रमुख बनवण्यात आलं. अनेक महत्वाच्या प्रकरणांचा तपास सचिन वाझेला सोपवून त्याच्याकरवी पैसे वसुलीचं काम चालायचं असंही ईडीने म्हटलं आहे.
गृहमंत्री असताना अनिल देशमुख सचिन वाझेला आपल्या घरी महत्वाच्या केसबद्दल माहिती घेण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी घरी बोलवायचे. मुंबईतील बार मालकांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश अनिल देशमुखांनी सचिन वाझेला दिल्याचं याआधी ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
कोरोना काळामध्ये लॉकडाउनदरम्यान जेव्हा सरकारने सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट-बार वर निर्बंध लावले होते, त्यावेळी सचिन वाझे अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुन बार मालकांकडून ३ लाख रुपये वसूल करायचा. मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमधून सचिन वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ४ कोटी ७० लाख रुपये वसूल केल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुन आपण ही रक्कम त्यांचे सेक्रेटरी कुंदन शिंदे यांच्याकडे दिल्याचं सचिन वाझेने ईडीच्या चौकशीत सांगितलं आहे. कुंदन शिंदे हा अनिल देशमुखांच्या श्री. साई शिक्षण संस्थेचा सदस्य आहे. या शिक्षण संस्थेत अनिल देशमुखांनी वसूल केलेला पैसा गुंतवण्यात आला होता. ज्यानंतर ईडीने नागपूरमधील या संस्थेच्या कार्यालयावर छापेमारी केली.
अनिल देशमुखांचा आणखी एक सहकारी सुर्यकांत पालांडे हा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बारमधून मिळणाऱ्या पैशांची व्यवस्था पहायचा. मुंबईतील बार मालकांकडून गोळा करण्यात आलेला पैसा अनिल देशमुखांनी आपला मुलगा सलिल आणि हृषिकेशच्या माध्यमातून बोगस कंपन्यांच्या द्वारे आपल्या शैक्षणिक संस्थेत वळवल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. ज्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT