ईडीच्या समन्सला अनिल देशमुखांचं उत्तर, म्हणाले कार्यालयात उपस्थित राहू शकत नाही!

मुंबई तक

• 05:25 AM • 29 Jun 2021

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीने बजावलेल्या समन्सला आपलं उत्तर दिलं आहे. मी ईडी कार्यालयात उपस्थित राहू शकत नाही, माझं वय ७२ वर्ष आहे आणि मला अनेक आजार आहेत. याऐवजी मी व्हर्च्युअल पद्धतीने आपलं स्टेटमेंट देऊ शकतो असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. ३-४ […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीने बजावलेल्या समन्सला आपलं उत्तर दिलं आहे. मी ईडी कार्यालयात उपस्थित राहू शकत नाही, माझं वय ७२ वर्ष आहे आणि मला अनेक आजार आहेत. याऐवजी मी व्हर्च्युअल पद्धतीने आपलं स्टेटमेंट देऊ शकतो असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. ३-४ दिवसांपूर्वी अनिल देशमुखांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांवर ईडीने छापेमारी केली. यानंतर अनिल देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनीही ईडीने अटक केली. या कारवाईनंतर अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावलं होतं, परंतू वकीलांमार्फत अनिल देशमुखांनी आपण हजर राहू शकणार नाही असं सांगून वेळ मागून घेतला होता.

यानंतर ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सलाही अनिल देशमुख यांनी उत्तर देत थेट चौकशीसाठी कार्यालयात जाणं टाळलं आहे. माझ्यावरील सर्व आरोप हे चुकीचे असून मी माझी बाजू मांडण्यासाठी वकीलाची नेमणूक केलेली आहे. ज्या लोकांनी गंभीर गुन्हे केले आहेत त्यांच्या म्हणण्यावरुन केंद्र सरकार मी राजकीय विरोधक असल्यामुळे आपल्यावर कारवाई करत असल्याची बाजू अनिल देशमुखांनी मांडली आहे.

दरम्यान अनिल देशमुख यांची बाजू मांडणारे वकील इंद्रपाल सिंग यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. “आज सकाळी ११ वाजता ईडीने देशमुख यांना हजर राहण्यास सांगितलं होतं. ईडीने कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतू कोणती कागदपत्र हवी आहेत हे स्पष्ट केलं नाही. आम्ही या प्रकरणात ईडीकडून ECIR ची मागणी केली आहे. त्यामुळे ईडीला कोणती कागदपत्र हवी आहेत हे जाणून घेण्यासाठी मी ईडी कार्यालयात चाललो आहे. आम्ही अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जाणार नाही आहोत. तपासयंत्रणांना आम्ही सर्व सहकार्य करतोय.”

त्यामुळे अनिल देशमुखांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता ईडीचे अधिकारी काय पावलं उचलतात हे पहावं लागणार आहे. सलग समन्स बजावूनही आरोपी चौकशीसाठी हजर राहिला नाही तर ईडीला कोर्टात जाऊन त्याच्याविरोधात वॉरंट जाहीर करण्याचा अधिकार आहे. याव्यतिरीक्त मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर ईडीने त्या आरोपीला अटकही करु शकतं. अनिल देशमुखांची तक्रार करणारे नागपूरचे वकील परमार यांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. परमार यांनी देशमुख यांचा घोटाळ्यात सहभाग असलेले पुरावे ईडीला दिले आहेत. त्यामुळे आता ईडी या प्रकरणी काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp