ईडी चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्ली रवाना झाले आहेत. एकीकडे ईडी देशमुखांची चौकशी करण्यासाठी त्यांना समन्स बजावत असताना देशमुखांच्या दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. ईडी चौकशीबद्दल दिल्लीत जाऊन अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी ईडीने देशमुखांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांवर छापे मारले. आतापर्यंत ईडीने देशमुखांना चौकशीसाठी ३ समन्स बजावले, मात्र प्रत्येक वेळी देशमुखांनी प्रत्यक्ष चौकशीला जाणं टाळलं. वाढत वय, आजार अशी कारणं देऊन देशमुखांनी प्रत्यक्ष चौकशीला हजर न राहता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी दाखवली.
मुंबईतील बारमालक आणि हॉटेल व्यवसायिकांकडून सचिन वाझेला १०० कोटी वसूल करायला सांगितल्याचा आरोप अनिल देशमुखांवर ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणाचा ईडी तपास करत असून यातील काही पैशांचे धागेदोरे हे देशमुखांच्या नागपूर येथील शिक्षण संस्थेशी जोडले गेल्याचा ईडीचा दावा आहे. देशमुखांच्या दिल्ली वारीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये.
Anil Deshmukh: ‘कसाबलाही कायद्याचा फायदा मिळाला होता’, अनिल देशमुखांचे वकील हायकोर्टात असं का म्हणाले?
दरम्यान शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान अनिल देशमुखांनी आपल्याविरोधात सुरु असलेली भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी हायकोर्टात अनिल देशमुख यांची बाजू मांडली. ‘देशमुख यांच्यावर दाखल केलेला खटला बेकायदेशीर आहे आणि कायदेशीर प्रक्रियेचा भंग आहे. ते पुढे म्हणाले की, ‘कसाबसारख्या (Ajmal Kasab) व्यक्तीलासुद्धा या देशात कायद्याच्या फायदा मिळाला आहे. इथे प्रत्येकाला कायद्यानुसार संरक्षण दिलं जातं.’
यापुढे बोलताना देसाई म्हणाले की, ‘मंजुरीशिवाय देशमुख यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाची चौकशी करणे हे बेकायदेशीर आहे. काय आपण कायदेशीर आवश्यकतांकडे दुर्लक्ष करू शकता? राज्यात (मंजुरीसाठी) संपर्क साधायला हवा होता, त्यामुळे संपूर्ण तपासच बेकायदेशीर आहे.’
ADVERTISEMENT