anil parab challenge to kirit somaiya after demolished office : म्हाडा (mhada) वसाहतीतील अनिल परब (anil parab) यांच्या कार्यालयाचा मुद्दा किरीट सोमय्यांनी (Kirit somaiya) उचलून धरला. त्यानंतर हे कार्यालय परबांनी स्वतःहून पाडलं. कार्यालय पाडल्यानंतर अनिल परब किरीट सोमय्यांविरुद्ध आक्रमक झाले. अनिल परबांनी कार्यालयाच्या प्रकरणाबद्दल खुलासा करत नारायण राणेंचं (Narayan Rane) घर आणि 56 म्हाडा वसाहतीतील रहिवाशांच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्यांना घेरलं.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले, “एक बातमी दिली जात आहे की, अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय तोडलं गेलं. याबाबत वस्तुस्थिती मला सांगायची आहे. 1960 पासून म्हाडाच्या बिल्डिंग तयार झाल्या. या बिल्डिंगमध्येच माझा जन्म झाला. या बिल्डिंगचा मी रहिवाशी आहे.”
पुढे बोलताना परब म्हणाले, “मी आमदार, माजी मंत्री म्हणून बोलत नाहीये, तर म्हाडातील आणि या बिल्डिंगमधील एक रहिवासी म्हणून बोलत आहे. या बिल्डिंगमध्ये माझं लहानपण गेलं. इथेच मी मोठा झालो. ज्यावेळी मी आमदार झालो. त्यावेळी या बिल्डिंग स्वतःच्या मालकीच्या आहेत. या बिल्डिंग म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाहीत.”
“इथल्या लोकांनी मला सांगितलं की आपण आमदार झाला आहात. आपलं जनसंपर्क कार्यालय आपल्या बिल्डिंगमध्येच राहू द्या. त्यामुळे सोसायटीची जागा तुम्ही वापरा, ती वापरायला आमची काही हरकत नाही. म्हणून सोसायटीची जागा मी वापरत होतो. परंतु या जागेवर काही लोकांनी तक्रारी केल्या”, असं अनिल परब पत्रकार परिषदेत म्हणाले.
किरीट सोमय्यांनी मंत्री झाल्यावर तक्रार दिली -अनिल परब
“मी मंत्री झाल्यानंतर किरीट सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्तांकडे जाऊन तक्रार केली. माझं अनधिकृत कार्यालय आहे, असं भासवून ती तोडण्याची मागणी केली. त्याच्या अनुषंगाने मला म्हाडाने नोटीस दिली”, असं परब म्हणाले.
“म्हाडाने जेव्हा मला नोटीस दिली, त्या नोटीसला मी उत्तर दिलं. सदर जागा माझी नसून, मी या जागेचा मालक नाहीये. माझा या जागेशी काहीही संबंध नाही. ही सोसायटीची जागा आहे. त्यानंतर म्हाडाने ही नोटीस मागे घेतली”, अशी माहिती परब यांनी यावेळी दिली.
अनिल परब या मुद्द्यावर असंही म्हणाले की, “हे झाल्यानंतर या इमारतीतील रहिवाशी उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने सांगितलं की, तुम्ही नियमितीकरण करण्यासाठी अर्ज करा. तसा अर्ज इमारतीने केला. त्यावर निर्णय घ्यायला आम्ही म्हाडाला सांगितलं. काही दिवसापूर्वी म्हाडाने सांगितलं की हे नियमित करता येणार नाही”
किरीट सोमय्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांवर दबाब टाकला -अनिल परब
म्हाडा अधिकाऱ्यांवर सोमय्यांनी दबाव टाकल्याचा आरोप परबांनी केला. “हे नियमित करून नका म्हणून किरीट सोमय्यांनी म्हाडावर दबाव टाकला. त्यामुळे म्हाडाने सोसायटीला पत्र दिलं की हे नियमित करता येणार नाही. त्यानंतर इमारतीने बैठक घेऊन स्वतः हून पाडून टाकण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या जागा स्वतःहून मोकळ्या केल्या गेल्या. ही जागा एलआयजीची आहे. लोअर इनकम ग्रुपचे लोक इथं राहतात.”
“गरीब मराठी माणूस इथं राहतो. त्याची ही घरं आहेत. त्या घराच्या बाजूची जागा स्वतः सोसायटीची असल्यामुळे थोडी जागा प्रत्येकाने वाढवली आहे. म्हाडाच्या 56 वसाहती आहेत. अशा पुनर्विकासाच्या मार्गावरती अशा प्रकारचे आदेश येणं. जी मूळ घरं होती 220 चौरसफूटांची, तिच बिल्डरने द्यायची. त्यामुळे मला असं वाटतं की किरीट सोमय्यांनी बिल्डरांची सुपारी घेऊन अशा प्रकारे माझ्यावर हल्ला केला आहे. माझा संबंध नसताना माझं नाव जोडून सगळीकडे अनिल परबचं कार्यालय असल्याचं सांगितलं”, असंही परबांनी म्हटलं आहे.
अनिल परब : नियमितीकरणाचं प्रकरण म्हाडाकडे प्रलंबित
“56 वसाहतीमध्ये जो गरीब माणूस राहतो. त्याने जी काय थोडीफार जागा वाढवली आहे. आज प्रत्येकाच्या मनात ही भीती आहे की उद्या या आदेशाचा फायदा घेऊन बिल्डर, ब्लॅकमेलर लोकांना पैशांसाठी ब्लॅकमेल करतील. पैसे देता की तुमची घरं तोडू, अशी भीती 56 वसाहतींमध्ये निर्माण झालेली आहे. आम्ही याचा म्हाडाला जाब विचारू. हा विषय आजचा नाहीये. ज्यावेळी घर वाढवली होती, त्यावेळी म्हाडाकडे 20 वर्षांपूर्वी नियमितीकरणासाठी अर्ज केला होता. ते प्रकरण म्हाडाकडे अजूनही प्रलंबित आहे”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
राणेंचं घर, किरीट सोमय्यांना अनिल परबांचं चॅलेंज: म्हणाले,…
“अनिल परबांचं ऑफिस तोडलं, तर पूर्ण दहशत निर्माण करता येईल आणि भाजपने हा किरीट सोमय्याच्या माध्यमातून साधलेला डाव आहे का? या सगळ्या कृतीला भाजपचा पाठिंबा आहे का? हा माझा प्रश्न आहे. त्याचबरोर किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे की, नारायण राणे यांचे घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. किरीट सोमय्यांनी तिथे माझ्याबरोबर येणार आहेत का? मी तर आता जाणारच आहे, सगळ्या म्हाडाच्या लोकांना घेऊन”, असा इशारा परब यांनी दिला.
“कोर्टाने आदेश दिलेले आहेत आणि नारायण राणे यांचं घर कशाप्रकारे तोडलं आहे, ते बघायचं आहे. किरीट सोमय्या कोण आहे? तो म्हाडाचा अधिकारी आहे, तो महापालिकेचा अधिकारी आहे, तो येऊन बघणारा कोण आहे?”, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
“या सोसायटीने म्हाडाला पत्र लिहिलं आहे की, आपापली जागा तोडली आहे. आपले अधिकारी पाठवा आणि रिपोर्ट तयार करा. त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करा. मग हे बघण्यासाठी म्हाडाने किरीट सोमय्याला नेमलं आहे का? जर बघणार असेल, तर माझ्याबरोबर 56 वसाहतींमध्ये जे जे वाढले आहेत, त्यांच्यावर तशीच कार्यवाही झाली तर त्याची जबाबदारी किरीट सोमय्याची असेल आणि किरीट सोमय्याला पाठिंबा देणाऱ्या भाजपची असेल”, असं म्हणत परबांनी भाजपला लक्ष्य केलं.
किरीट सोमय्याला मी मोजत नाही, पण… -अनिल परब
“दोन वर्षे झाली माझ्यावर आरोप होताहेत. त्यावरून कधीही किरीट सोमय्याला उत्तर दिलं नाही. त्याचं कारण असंय की किरीट सोमय्याला मी तरी मोजत नाही. परंतु आज म्हाडातील गरीब रहिवाशांचा प्रश्न आलाय आणि म्हणून मी रस्त्यावर उतरलो आहे. आम्ही किरीट सोमय्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. उत्तर द्यावंच लागेल”, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT