अँटेलिया प्रकरणात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंना झालेली अटक, मनसुख हिरेन यांचा मृत्यू, त्यापाठोपाठ राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट या गोष्टींचा सामना करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आता आणखी एका नवीन वादाला सुरुवात झाली. हा वाद अंतर्गत असून सरकारमधील महत्वाचा घटक असलेला काँग्रेस पक्ष निधी वाटपावरुन नाराज असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील काँग्रेस मंत्र्यांची शुक्रवारी बैठक पार पडली, ज्यात महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील हे देखील उपस्थित होते. या बैठकीत असमान निधी वाटपाचा मुद्दा चर्चेला आला.
ADVERTISEMENT
“काँग्रेस मंत्र्यांना मिळत असलेल्या निधीवाटपावरुन अनेकांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिक निधी मिळतो आहे. या प्रकरणावर आम्ही विस्तृत चर्चा केली. याव्यतिरीक्त सचिन वाझे, मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरही आमची चर्चा झाली”, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना, दोन दिवसांत पर्याय मिळाला नाही तर लॉकडाउन लावण्यात येईल असा इशारा दिला आहे. राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की, ‘मी आता फक्त संपूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे. पण लॉकडाऊन जाहीर करत नाहीए. पुढील दोन दिवसात मी तज्ज्ञ लोकांशी चर्चा करणार आहे. पण पुढील काही दिवसात परिस्थिती बदलली नाही तर मात्र आपल्याला लॉकडाऊन करावाच लागेल.’ असं स्पष्टपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (2 एप्रिल) सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, पुढील काही दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर मात्र लॉकडाऊनची वेळ आपल्यावर येईलं.
ADVERTISEMENT