मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. सांगलीतल्या इस्लामपूरमधल्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राज ठाकरेंच्या विरोधातलं वॉरंट रद्द केलं आहे. शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंच्याविरोधात अटक वॉरंट काढलं होतं. त्यानंतर त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करून जामीन मंजूर करावा असा अर्ज इस्लामपूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
या अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली आहे. कनिष्ठ न्यायालय ज्यावेळी निर्देश देईल त्यावेळी राज ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावं असं सुनावणीच्या वेळी म्हटलं आहे. राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि शिरीष पारकर यांच्यासह दहा जणांच्या विरोधात जमाव गोळा करणं, शांतता भंग करणं, चुकीच्या मार्गाने हुसकावणं, घोषणाबाजी करणं अशा विविध कलमांखाली २८ जानेवारी, २५ जानेवारी, ११ फेब्रुवारी तसंच २८ एप्रिल या तारखांना गैरहजर राहिल्या प्रकरणी शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२००८ मध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जे आंदोलन झालं त्या प्रकरणी शिराळा कोर्टाने वॉरंट काढलं होतं. सध्या राज ठाकरे यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्यावर रूग्णालयात शस्त्रक्रियाही होणार होती मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाच्या पेशी आढळल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. याच कारणामुळे राज ठाकरे हे सुनावणीसाठी हजर राहू शकले नाहीत.
बीडच्या कोर्टानेही जारी केला वॉरंट
सांगली आधी बीडच्या परळी जिल्हा कोर्टानेही राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट लागू केला. राज ठाकरेंनी मराठी पाट्यांसाठी आंदोलन केलं होतं. त्यासंदर्भातल्या प्रकरणात हे वॉरंट लागू केला गेला होता. या प्रकरणी परळी कोर्टाने मुंबई पोलिसांना पत्रही लिहिलं होतं.
राज यांच्या विरोधात आजवर अनेक केसेस आहेत. त्यासंदर्भात राज ठाकरेही भाष्य करतात. राज ठाकरे हे त्यांच्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी भाषण केल्यानंतर त्याचे पडसाद पुढचे आठ- दहा दिवस उमटत असतात हे आपण पाहिलं आहे.
ADVERTISEMENT