महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जाऊन आता शिंदे फडणवीसांचं सरकार आलं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अशात माजी खासदार निलेश राणे यांचा व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओत ते अधिकाऱ्यासोबत अरेरावी करत त्याला झापताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे व्हीडिओत?
माजी खासदार निलेश राणे हे मालवण येथील मुख्यधिकाऱ्याशी अत्यंत अरेरावीच्या भाषेत बोलत आहेत. आत्ता सत्ता बदलली आहे गाठ माझ्याशी आहे ही दमदाटी त्यांनी या अधिकाऱ्याला केली आहे. महाराष्ट्राचे टोक दाखवू का तुम्हाला असाही प्रश्न निलेश राणे यांनी या अधिकाऱ्याला विचारला आहे. मालवण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी निलेश राणे बोलत आहेत हाच व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
मालवण शहरातील गटारांच्या साफसफाईचा मुद्दा पुढे करून निलेश राणे हे काही कार्यकर्त्यांसह थेट मालवण नगरपरिषदेवर पोहचले. त्यावेळी त्यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याशी अरेरावीची भाषा केली. तसंच सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे असा इशारा निलेश राणे यांनी जिरगे यांना दिला. राज्यात आता भाजपचं सरकार आलं आहे, मी हे काहीही खपवून घेणार नाही. आत्तापर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल असंही निलेश राणे यांनी जिरगे यांना सुनावलं आहे. त्यानंतर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
दुसरीकडे हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. निलेश राणे तसंच तिन्ही राणे कंपनी स्वतःला काय समजते असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
काय आहे अंजली दमानिया यांचं ट्विट?
कोण आहेत निलेश राणे? ते सरकारी अधिकाऱ्याला अशा पद्धतीने कसे काय झापू शकतात? ते सरकारी कार्यालयात जाऊन धमक्यांची भाषा कशी करू शकतात. ही राणे कंपनी स्वतःला काय समजते? हा माणूस मुख्याधिकाऱ्यांना कसा काय झापतो? या निलेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा. ही मागणी करणारं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनाही निलेश राणे यांनी इशारा दिला आहे. मर्यादेत राहा असं म्हणत निलेश राणे यांनी त्यांना इशारा दिला आहे. तर राणेंची मुलं लहान आहे त्यांना समज देण्याची गरज आहे असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. बुधवारपासून हे प्रकरण ताजं असताना आता हा नवा व्हीडिओ समोर आला आहे ज्यामध्ये निलेश राणे हे एका अधिकाऱ्याला धमकीवजा इशारा देताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT