दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. जवान आणि पोलिसांच्या समर्थनार्थ शरद पवार यांची फेसबुक पोस्ट का पडली नाही? संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
ADVERTISEMENT
कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही? सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा जो वावर आहे त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंडं आता का शिवली आहेत हा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्या वतीने विचारत आहोत, असं आपल्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले.
शिवाय, केवळ राजकीय सूडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे. देश यांना सोडणार नाही, असंही ते म्हणाले. जवान असो किंवा दिल्ली पोलीस या सर्वांनी जो संयम दाखवला तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना आंदोलन चिघळलं होतं का? माथी भडकावण्याचं काम शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नाही, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे शरद पवार आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावं. पोलिसांवर लाठ्या उचलणं, जवानांना लाथा बुक्क्याने मारणं, तलवारी काढणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे स्पष्ट करावं. या आंदोलनाला त्यांनी तीव्र रुप दिलं त्यांची चौकशी झाली पाहिजे पण ज्यांनी समर्थन दिलं त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हिंसाचारात काही भाजपाशी संबंधित लोकांची नावं समोर येत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ज्यांचे स्वत:चे दामन रक्ताने माखले आहेत त्यांनी दुसऱ्यावर आरोप करु नये. जे सत्य आहे ते देशाने पाहिलं आणि बाकीचं सत्य चौकशीत समोर येईल, असंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT