विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदान प्रक्रियेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी विरोध केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा आहे. मात्र राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रक्रियेला विरोध केल्याने अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळणार असंच चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी राज्यपालांना निवडणुकीच्या संदर्भात पत्र सादर करून निवडणूक घेण्याची संमती दिली होती. आज त्यावर राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून उत्तर दिलं आहे.
हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी
राज्यपालांनी काय म्हटलं आहे?
महाराष्ट्र सरकारने केलेली विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मागणी केली होती. यासाठी त्यांनी नियम बदलला आणि गुप्त मतदान प्रक्रियेच्या ऐवजी आवाजी मतदान असा बदल केला. मात्र राज्यपालांनी ही आवाजी मतदानाची मागणी फेटाळून लावली आहे. निवडणूक प्रक्रियेत करण्यात आलेला बदल असंवैधानिक आहे. असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी वेगवेगळी प्रक्रिया कशी काय असू शकते? असंही राज्यपालांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. त्याला आता एक वर्ष झालं आहे. हिवाळी अधिवेशनात तरी अध्यक्ष निवडला जावा अशी मागणी राज्यपालांनी केली होती. मात्र आता त्यांनी आवाजी मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे विधासभा अध्यक्ष निवडणुकीचा पेच राज्य सरकारपुढे निर्माण झाला आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय घडलं होतं?
विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातलील समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल मांडला. ज्यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपल्याकडे बहुमताचा आकडा आहे असं आपलं म्हणणं आहे तर मग एवढी भीती का? आपल्या आमदारांवर एवढा अविश्वास आहे का?
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नावर नाना पटोले यांनी उत्तर दिलं ते म्हणाले की घोडेबाजार बंद व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपण पहिल्यांदा नियम बदलत आहोत का? या नियम बदलाला आमचा पाठिंबा आहे असंही नाना पटोले म्हणाले. यानंतर सरकार भीतीपोटी हे सर्व करत आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बुधवारी याच मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्यागही केला.
ADVERTISEMENT