औरंगाबादच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या, दोन पानांची सुसाईड नोटही सापडली

मुंबई तक

• 02:10 AM • 23 Sep 2022

औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल आग्रहारकर यांनी घरातल्या जिममध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेऊन त्यांचं आयुष्य संपवलं आहे. ही घटना गुरूवारी घडली. आग्रहारकर यांनी आत्महत्येपूर्वी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. चार व्यावसायिकांनी आपली कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याने आपण आत्महत्येचं पाऊल उचलत आहोत असं या नोटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात […]

Mumbaitak
follow google news

औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल आग्रहारकर यांनी घरातल्या जिममध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेऊन त्यांचं आयुष्य संपवलं आहे. ही घटना गुरूवारी घडली. आग्रहारकर यांनी आत्महत्येपूर्वी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. चार व्यावसायिकांनी आपली कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याने आपण आत्महत्येचं पाऊल उचलत आहोत असं या नोटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल आग्रहारकर यांनी औरंगाबादमधल्या उल्कानगरी भागात असलेल्या राहत्या घरातल्या जिममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी ते बाहेर आलेच नाहीत त्यामुळे त्यांच्या खोलीत डोकावून पाहिलं असता त्यांचा मृतदेह पंख्याला लटकत असल्याचं दिसून आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली.

औरंगाबादमधले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत अनिल आग्रहारकर

अनिल आग्रहारकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून आग्रहारकर यांचा लौकिक होता. आग्रहारकर हे त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि मुलीसह या ठिकाणी राहात होते.

नेमकी ही घटना कशी समोर आली?

अनिल आग्रहारकर यांच्या पत्नीला सर्वात आधी ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांना खाली उतरवून जवळच्याच हेडगेवार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आंलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घराची झडती घेतली. तेव्हा त्यांच्या बेडरूममध्ये पोलिसांना डायरी आढळून आली. डायरीत आग्रहारकर यांनी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांनी यामध्ये नमूद केलं आहे. पोलीस आता त्या अनुषंगाने पुढील तपास करत आहेत.

अनिल आग्रहारकर हे बांधकाम विश्वातील अग्रगण्य संस्था कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेचे कोषाध्यक्ष होते. त्यांचा चौरंगी हॉटेलच्या जागेवर बहुमजली इमारतीचा प्रोजेक्टही सुरू होता. तसंच इतर साईटही सुरू होत्या अशीही माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी त्यांचे मोठ्या स्वरूपात गृहप्रकल्प तसेच व्यवसायिक प्रकल्प सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने उल्कानगरी, गारखेडा, सूत गिरणी चौकात त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून अग्रस्थानी होते.

    follow whatsapp