मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या पेंग्विन प्रकल्पावरुन एकीकडे वाद सुरु असला तरीही भायखळा येथील राणीच्या बागेतून एक गोड बातमी समोर आली आहे. पेंग्विन कक्षात दुसऱ्यांदा पाळणा हलला असून दोन नवे छोटे पेंग्विन लवकरच मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत.
ADVERTISEMENT
१ मे रोजी जन्मलेल्या बाळाचं नाव ओरिओ ठेवण्यात आलं आहे. यानंतर १९ ऑगस्टला आणखी एका पेंग्विनने जन्म घेतला आहे. लिंग तपासणी केल्यानंतर त्याचं नाव ठेवण्यात येणार असल्याचं समजतंय.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दल माहिती दिली. २०१८ साली फ्लिपर या मादीने एका पिल्लाला जन्म दिला होता. परंतू एका आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला. १ मे २०२१ रोजी जन्मलेला पेंग्विन ओरिओ आता साडेतीन महिन्यांचा झाला असून तो इतर पेंग्विनसोबत बागडू लागला आहे अशी माहिती प्राणी संग्रहालयाने दिली. त्याची प्रकृतीही ठणठणीत असल्याचं कळतंय.
सुरुवातीच्या काळात नवीन जन्म झालेल्या ओरिओची सर्वांनी मनापासून काळजी घेतली. डॉक्टरांची टीम, पशुवैद्यकीय अधिकारी ओरिओच्या तब्येतीकडे त्याच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देत होती. यानंतर ओरिओची तब्येत आता व्यवस्थित झालेली असल्याचं कळतंय. जन्मल्यापासून ते तीन महिन्यांपर्यंत पेंग्विनची प्रकृती ही नाजूक असते यात ते मृत्यू पावण्याची भीती असते. त्यामुळे ओरिओसाठी या प्राणी संग्रहालयातले कर्मचारी खूप मेहनत घेत होते.
किशोरअवस्थेतून प्रौढावस्थेत येण्याची प्रक्रीया पेंग्विनसाठी तणावपूर्वक असते. त्यासाठी त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. कितीही राजकारण झालं तरीही हे पेंग्विनच आता मुंबईची ओळख बनलेले आहेत. त्यांची काळजी घेण्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
ADVERTISEMENT