बीड : स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून अधिक परताव्याचे आमिष दाखवून पती-पत्नीने एका कर्ज सल्लागारास तब्बल साडे अठरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याप्रकरणी केज येथील कर्ज सल्लागार सुहास दैवानराव मस्के यांच्या तक्रारीवरुन संबंधित दाम्पत्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
सुहास दैवानराव मस्के यांच्या फिर्यादीनुसार, गणेश राजाराम भिसे आणि त्याची पत्नी पूजा भिसे (दोघेही रा. विवेकानंद नगर, अंबाजोगाई) यांच्या कंपनीचे अंबाजोगाईतील भगवानबाबा चौकात कार्यालय आहे. या दाम्पत्याने त्यांच्या स्वराज्य जी. आर. बी. इंडस्ट्रीज प्रा.लि. या कंपनीबाबत सुहास मस्के यांना खोटी माहिती दिली.
तसंच कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यांच्या आग्रहामुळे मस्के यांनी सदर कंपनीत तब्बल ३३ लाख रुपये गुंतविले. त्यानंतर भिसे दाम्पत्याने काही दिवसात मस्के यांना परताव्यापोटी १४ लाख ३५ हजार ५०० रुपयांची रक्कम दिली. मात्र नंतर उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु केली. अनेकदा मागणी करून देखील त्यांनी मस्के यांची १८ लाख ६४ हजार ५०० रुपयांची मुद्दल रक्कम परत केली नाही.
अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मस्के यांनी आज पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून गणेश आणि पूजा भिसे या दोघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गव्हाणे करत आहेत. दरम्यान, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT